
पुणे : बांधकाम क्षेत्राच्या वाटेवर महागाईचे दगड
पुणे : कोरोनामुळे थांबलेले उत्पादन, इंधनाच्या दरवाढीमुळे महागलेला वाहतूक खर्च, परदेशातून येणाऱ्या वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि आता रशिया-युक्रेन युद्धाचे झालेले परिमाण याचा झटका बांधकाम क्षेत्राला बसत आहे. गेल्या काही महिन्यांत बांधकाम साहित्याच्या किमतीत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सतत होत असलेल्या दरवाढीमुळे प्रति चौरस फूट बांधकाम खर्चात ५०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या दरवाढीचा परिमाण घरांच्या किमतींवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रशिया-युक्रेन युद्धाच्या आधी बांधकाम साहित्याच्या किमतीत सुमारे ३५ टक्के वाढ झाली होती. त्यानंतर दर स्थिर होतील, असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. युद्ध सुरू झाल्यानंतर पुन्हा दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ नियंत्रणात ठेवावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. तसेच इंधन दरवाढीचा नेमका काय परिमाण झाला याची माहिती आम्ही पत्रद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रेडाईचे माध्यम समन्वयक कपिल गांधी यांनी दिली.
स्टील ११३ टक्क्यांनी महागले
गेल्या दोन वर्षांत स्टील ११३, तर सिमेंट ३५ टक्क्यांनी महागले आहे. जानेवारी २०२० रोजी स्टील ४० रुपये प्रतिकिलो होते. आता ते ८५ रुपयांवर पोचले आहे, तर सिमेंटची बॅग २७० वरून ३६५ रुपयांना झाली आहे. स्टील खालोखाल प्लंबिंगच्या साहित्यात ११० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
न विकलेल्या सदनिका महागणार
कोरोनाकाळात अनेक गृहप्रकल्पांचे बांधकाम थांबले होते. त्यामुळे मुळात काही प्रकल्प उशिरा पूर्ण झाले, तर नवीन प्रकल्प थांबले होते. त्यात साहित्याच्या दरवाढीमुळे आता न विकलेल्या सदनिका महागणार आहे, तसेच भविष्यात नवीन गृहप्रकल्पांच्या किमतीदेखील वाढू शकतात. कारण एखादा व्यावसायिक पाच ते सहा हजार रुपये प्रतिचौरस फुटाने सदनिकांची विक्री करीत असेल तर तो वाढलेल्या प्रतिचौरस खर्च कसा सहन करणार, असा प्रश्न क्रेडाईने उपस्थित केला आहे.
Web Title: Inflation Construction Sector Prices Rise Russia Ukraine War
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..