esakal | विद्यार्थ्यांना शाळांतर्फे कोरोना मार्गदर्शक सूचनांची माहिती द्या : अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

"विद्यार्थ्यांना शाळांतर्फे कोरोना मार्गदर्शक सूचनांची माहिती द्या"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना संसर्गाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे येत्या ४ आक्टोबरला शाळा सुरू झाल्यानंतर शाळांतर्फे सर्व विद्यार्थ्यांना कोरोना मार्गदर्शक सूचना आणि त्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत माहिती द्यावी, असा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.१) दिला.

पालक मंत्री पवार यांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्यावतीने सर्व सरकारी व खासगी शाळांना दिल्या जाणार आहेत. शहर व जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे, शहर व जिल्ह्यातील आमदार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

हेही वाचा: घटस्थापनेपासून मंदिरं उघडणार; मुंबईकरांना मात्र 'हा' नियम लागू

म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना मास्क घालणे, दोन विद्यार्थ्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, सातत्याने हात स्वच्छ धुणे, सर्दी, खोकला व ताप यासारखी लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना घरीच थांबण्यास सांगणे, सॅनिटायझरचा वापर आणि कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत सातत्याने माहिती देणे, वर्गातील बैठक व्यवस्थेतही अंतराचे पालन होईल याकडे लक्ष देणे, आदी नियमांची पालन होणे आवश्‍यक आहे.’’

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे पुणे जिल्ह्यातील कोरोनाची सद्यःस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ५ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सप्टेंबर महिन्यात उच्चांकी २४ लाख ३७ हजार १४१ इतके विक्रमी लसीकरण झाले. जिल्ह्यातील ८५ टक्के नागरिकांना एक डोस तर, यापैकी ४७ टक्के ४७ टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत.

कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांसाठी उपचाराची सुविधा

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता कमी झाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात सर्वच रुग्णालयांची आणि बेडची (खाटा) आता कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी गरज नाही. त्यामुळे सध्या कोरोनासाठी असलेली रुग्णालये आणि त्यामधील खाटा आता कोरोनाव्यतिरिक्त असलेल्या अन्य रुग्णांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला.

loading image
go to top