शरद पवारांनीही केली होती पुणे ते शिवनेरी सायकल सफर...

शरद पवारांनीही केली होती पुणे ते शिवनेरी सायकल सफर...

बारामती : ''जीवन जगताना निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. मलाही जेव्हा विविध ठिकाणी जायचे असते तेव्हा, मी विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर टाळत रस्त्याच्या मार्गाने जातो. निसर्गाच्या सहवासात तुम्ही जितके जाल तितकी तुमची प्रगल्भता वाढेल.'' असा कानमंत्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीकर युवा खेळाडूंना दिला.

विद्यार्थी दशेत मीही पुणे ते शिवनेरी सायकल सफर केल्याचे सांगत अनेकांना पवार यांनी आज सुखद धक्का दिला. बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी नुकतीच बारामती-शिवनेरी-बारामती अशी सायकल सफर केली. या फाऊंडेशनच्या सदस्यांनी आज पवार यांची गोविंदबाग येथे सदिच्छा भेट घेतली. तेव्हा मार्गदर्शन करताना पवार यांनी त्यांना वरिल कानमंत्र दिला.

पवार म्हणाले, ''तुम्ही सायकलवरुन शिवनेरी दर्शन केल्याने त्या परिसराची तुम्ही पाहणी केली, निसर्गाच्या जवळ तुम्ही गेलात. निसर्ग वाचनाची आवड तुम्हाला या निमित्ताने होईल. बारामतीत सायकलसह खेळाची संस्कृती रुजू पाहते ही बाब समाधानाची आहे. विद्यार्थी दशेत मीही पुणे ते शिवनेरी सायकलवरुन गेलो होतो. त्या काळात वाहनांची सोय नव्हती व आमच्याकडे वाहनेही नव्हती. त्यामुळे आम्ही सायकलवरुन शिवनेरी गाठले.''   

पवार पुढे म्हणाले, ''मीही जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा हवाई मार्ग टाळतो. कारण मलाही रस्त्यांची माहिती होते. त्या भागातील परिस्थिती काय आहे, हे समजते. लोकांशी संवाद साधता येतो. त्या परिसरात कोणती पिके कशी येतात? शेतकऱ्यांची काय अडचण आहे? हे समजते. या निमित्ताने मला लोकांनाही भेटता येते. त्यांच्याशी संवाद साधता येतो. थोडक्यात तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जातानाच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचीही जाणीव तुम्ही ठेवायला हवी असाही कानमंत्र पवार यांनी खेळाडूंना दिला.

बारामती स्पोर्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी प्रास्ताविकात फाऊंडेशनच्या स्थापनेमागील पार्श्वभूमी विशद केली. बारामतीत नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे ननवरे यांनी पवार यांना या प्रसंगी सांगितले.

खेळाडूही भारावले....
क्रिडासंस्कृती जोपासणाऱ्या शरद पवार यांची अचानकच झालेली भेट आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनासह खुद्द त्यांनीही सायकलवरुन पुणे ते शिवनेरी प्रवास केल्याचा किस्सा ऐकल्यानंतर बारामतीतील खेळाडू भारावून गेले. केवळ राजकारणी म्हणून नव्हे तर एक क्रिडाप्रेमी म्हणूनही त्यांच्याविषयी आज आदर दुणावल्याचे खेळाडूंनी यावेळी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com