श्रावणात नागपंचमी साजरी केली जाते कारण...

nagpanchami.jpg
nagpanchami.jpg

बालेवाडी (पुणे) : श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीच्या दिवशी येणारा हा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी घराघरातून नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची पद्धत आहे. महिला, मुली तसेच नवविवाहिता  यासाठी हा सण म्हणजे एक खास आकर्षण असते. कारण नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया,  मुली, झाडांना झोके बांधून, मनसोक्त झोके घेतात, गाणी म्हणतात.  हौस म्हणून हातावरती मेंदी लावली जाते. या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन झोके खेळणे, झिम्मा-फुगडी, फेर धरणे असे खेळ खेळतात. हल्ली शहरात याचे प्रमाण थोडे कमी झाले असले तरी काही क्लब किंवा संस्थेतील महिला एकत्र येत आपली परंपरा जपण्यासाठी हे खेळ खेळतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामीण भागात तर नागपंचमीच्या आधी आठ दिवसांपासूनच महिला एकत्र येत फेर धरून, गाणी म्हणत  हा सण साजरा करतात.  नागपंचमीचे नवविवाहित मुलींना खूप अप्रूक असते. कारण लग्नानंतरची तिची पहिली नागपंचमी असते. अशावेळी तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जायला येणार असतो. पण यावर्षी मात्र लॉकडाऊनमुळे  या नवविवाहितांचा थोडासा हिरमोड होणार आहे. हक्काची सुट्टी म्हणजे माहेरी जाण्याची संधी या वर्षी हुकणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनात थोडीशी रुकरुक असणे हे साहजिक आहे.  पण तरीही त्यांनी निराश न होता  सासरीच नागाची पूजा करून हा सण साजरा करावा.

नागपंचमी का साजरी करतात?                 

याबद्दल एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे एकदा एक शेतकरी शेतात नांगरट  करत असताना त्याच्याकडून नागिनीची तीन पिल्ले चुकून मृत्युमुखी पडतात  व नागिन चिडते व त्याला चावायला लागते,  तेव्हा  शेतकऱ्याची बायको त्या नागिनीची माफी मागते तिची पूजा करते. नागिन शेतकऱ्याला माफ करते. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत व महिला या नागाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी महिला नटून-थटून नागदेवतेची पूजा करण्यासाठी वारुळाला जातात. तिथे वारुळाला दूध, साळीच्या लाह्यांचा नैवेद्य  दाखवतात. पण काही गावातून मात्र अजूनही  जिवंत नागाची पूजा करतात. त्याला दूध पाजतात. पण दुधामुळे हि नागांना त्रास होतो हे आता शास्त्रीय दृष्टीने सिद्ध झाले आहे.                            

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरंतर नाग म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र म्हटला जातो. कारण शेतात जेव्हा उंदरांचा सुळसुळाट होतो,  तेव्हा सर्प वर्गातील प्राणी त्यांची शिकार करून त्यांची संख्या नियंत्रणात आणतात. उंदीर वाढले तर शेतात खूप नुकसान करतात, धान्य फस्त करतात,  मोठ्या झाडांची मुळे कुरतडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे  या सापांकडूनच त्यांची संख्या नियंत्रित होते. हे लक्षात घेऊन हा सण साजरा करावा आणि इतरांना पण सांगावे. जिवंत नागाची पूजा करण्यापेक्षा फोटो किंवा प्रतिमेचे पूजन करावे जेणेकरून नागांना होणारा त्रास कमी होईल. नागांचे  विष काढून ते  विकले जाते. त्यातून पैसे कमवले जातात त्यांचे दात काढले जातात त्यामुळे नागांना  शिकार करणे अवघड होते. एकदा दात काढले की नागाला किंवा सापाला आपले भक्ष पकडता येत नाही.  आणि या  नाग किंवा साप पकडणाऱ्या लोकांकडे कायमचे बंदिस्त  होऊन राहवे  लागते.  खरी नागपंचमी साजरी करायची तर फोटोतील नागदेवतेची, प्रतिमेची  पूजा करूनच करा हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com