पुणे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी जाहीर केली पोलिसांसाठी अभिनव योजना

मिलिंद संगई
Thursday, 14 January 2021

स्पर्धेच्या निमित्ताने पोलिस दलात उत्साह निर्माण करुन कार्यक्षमता वाढविण्याचा पोलिस अधीक्षकांचा या मागचा प्रयत्न आहे.

बारामती : जिल्हा पोलिसांची कामगिरी अधिक उंचवावी, कार्यक्षमता वाढावी व पोलिसांचा कारभार अधिक लोकाभिमुख होण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पारितोषिक योजना जाहिर केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांसाठी पोलिस स्टेशन ऑफ द मंथ या शीर्षकाखाली ही पारितोषिक योजना राबवली जाणार आहे.

मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय

या योजनेत ए ते एस या इंग्रजी आद्याक्षरानुसार विविध प्रकारातील गुन्ह्यांच्या उकलीनुसार प्रत्येक पोलिस ठाण्याला गुण दिले जाणार आहेत. प्रत्येक महिन्यात जे पोलिस ठाणे कार्यक्षम ठरेल त्यांना दहा हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. 

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 

पोलिस ठाण्यात चालणा-या सर्वच कामकाजाचा आढावा या निमित्ताने घेतला जाणार असून या स्पर्धेच्या निमित्ताने पोलिस दलात उत्साह निर्माण करुन कार्यक्षमता वाढविण्याचा पोलिस अधीक्षकांचा या मागचा प्रयत्न आहे. एकीकडे जातीय सलोखा वाढविणे, स्त्री सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, नागरिकांशी सौहार्दाचे संबंध याला महत्व देताना गुणवाढ होईल तर  दुसरीकडे दंगल, महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, लाचलुचपत कारवाई, आरोपी पळून जाणे, पोलिस कोठडीत मृत्यू अशा घटना घडल्यास गुण कमी करण्याचाही इशारा यात दिलेला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मुद्यांवर गुणांकन होणार...
•    गुन्ह्यांची उकल व प्रकटीकरण
•    मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण
•    प्रलंबित गुन्ह्यांची टक्केवारी
•    न्यायालयातील दोषसिध्दी प्रमाण
•    फरारी आरोपींच्या संख्येतील घट
•    समन्स व वॉरंट बजावणीतील घट
•    तडीपार मोका व झोपडपट्टी दादा प्रकरणातील कारवाई
•    अवैध दारु व जुगार तसेच जप्त मुद्देमालातील वाढ व घट
•    अर्ज, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण
•    हरवलेल्या बालकांच्या बाबतीतील प्रमाण.
•    मोटार वाहन कायद्यान्वये कारवाईत वाढ व घट
•    मोटार अपघातातील बळींची संख्या वाढ व घट
•    अवैध शस्त्रास्त्रे, स्फोटके कारवाई तसेच सावकारी गुन्हे प्रमाण
•    सत्र न्यायालयातील खटल्यात सरकारी पंच घेण्याचे प्रमाण
•    मुद्देमाल निर्गतीचे प्रमाण
•    पोक्सोअंतर्गत तसेच महिलांच्या शोषणाबाबतच्या गुन्ह्यांबाबत
•    विशेष कामगिरी 
•    गंभीर गैरप्रकार व निष्काळजीपणा

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innovative scheme of sp to enhance the performance of the police