मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय

Panipat War
Panipat War

स्वाभिमानाच्या रणसंग्रामास २६० वर्षे पूर्ण
पुणे - ‘पानिपतच्या रणसंग्रामामुळे भारत मोठ्या परकी आक्रमणापासून वाचला. मराठ्यांच्या ध्येयाचा आणि कर्तृत्वाचा हा रणसंग्राम आहे. या संघर्षात मराठ्यांच्या ध्येयाचा विजयच झाला. हा लढा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा आहे...’

पानिपतच्या रणसंग्रामास उद्या (ता. १४) २६० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने इतिहास अभ्यासकांनी या रणसंग्रामाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडला. या रणसंग्रामामुळे देश मोठ्या परकी आक्रमणापासून वाचला आणि त्यापुढील काळातही मराठ्यांच्या पराक्रमाची पताका फडकतच राहिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पानिपतचा रणसंग्राम ध्येयाचा आहे, असे सांगताना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले, ‘भारतावर १७३८-३९मध्ये इराणच्या नाझीरची स्वारी आली होती. याला मुगल साम्राज्य रोखू शकले नाही. नाझीरशहाच्या स्वारीनंतर मुघल साम्राज्य दबले गेले होते. त्यामुळे त्यांनी मराठ्यांकडे मदत मागितली. त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर अहमदशहा होता. त्याने १७५२ मध्ये मराठ्यांकडे मदत मागितली. त्यावेळी झालेल्या तहाला अहमदी तह म्हणतात. त्यानुसार मराठ्यांनी केलेल्या रक्षणार्थ त्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देण्यात आली. तहानुसार मराठ्यांनी १७५७-५८ मध्ये अब्दालीचा पराभव केला.

त्यानंतर अब्दाली पुन्हा दिल्लीवर चालून आला. त्यावेळी झालेला रणसंग्राम म्हणजे पानिपतचा होय. अहमदी तहानुसार मराठे मदतीसाठी गेले. परंतु मुघल व्यवस्थेने मराठ्यांना योग्य रसद दिली नाही. मराठ्यांनी ध्येयासाठीच हा लढा दिला आणि ते ध्येय साध्य झाले. या रणसंग्रामानंतरही अब्दालीला दिल्ली काबीज करता आली नाही. मराठ्यांच्या पराक्रमामुळे कोणाचीच दिल्लीपर्यंत येण्याची हिम्मत झाली नाही, हे ध्येय साध्य करण्यात मराठे यशस्वी झाले. मराठ्यांनी कर्तव्यासाठी बलिदान केले.’’

देशाला वाचविले
पानिपतचा इतिहास पराभवाचा नाहीच, असे स्पष्ट करत ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी सांगितले, ‘‘अठराव्या शतकात दिल्ली म्हणजे देशावर कब्जा मिळविण्यासाठी दोन शक्ती आल्या होत्या. त्यातील पहिली अफगाणिस्तानातून अब्दालीच्या तर दुसरी इंग्रजांच्या रूपाने आली होती. इंग्रज कलकत्तापर्यंत थांबले तर, अब्दालीचा दिल्लीवर डोळा होता. या दोघांना मराठ्यांनी खऱ्या अर्थाने शह दिला. दिल्ली काबीज केली म्हणजे संपूर्ण भारतावर वर्चस्व गाजविता येईल, असा अब्दालीचा विचार होता. त्याला मराठ्यांनी झुंजविले. मराठ्यांनी अब्दालीच्या आक्रमणापासून देशाला वाचविले. या रणसंग्रामापूर्वी मराठ्यांनी १९५६-५७ मध्ये दिल्लीला आक्रमणापासून वाचविले होते. मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले होते.’’

‘या रणसंग्रामासाठी मराठ्यांची आक्रमकता मोठी होती,’ असे सांगत मॉडर्न महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या माजी प्रमुख श्रुती भातखंडे म्हणाल्या, अब्दालीच्या सैन्याची तयारी मोठी होती. मराठ्यांना योग्यवेळी रसद मिळाली नाही. सेनापती दिसेनासे झाल्याने मराठ्यांचा धीर खचला. त्यातून त्यांना सावरायला वेळ मिळाला नाही.’

इतिहास तज्ज्ञ म्हणतात ...

  • नाझीरशहाने २० हजार तर, अब्दालीने १५ हजार महिला पळविल्या.
  • नाझीरशहाच्या आक्रमणामुळे मुघल दबले.
  • अहमदशहाशी केलेल्या तहानुसार मराठे मुघलांच्या मदतीला.
  • तहानुसार मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला.
  • पानिपतच्या संघर्षात अब्दालीचे नुकसान; दिल्लीवरील सत्तेचे स्वप्न भंगले.
  • मराठ्यांकडून कर्तव्यासाठी बलिदान.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com