शिलालेख पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

नागनाथ शिंगाडे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे ढमढेरे घराण्यातील सरदारांचे ऐतिहासिक वाडे व गढी असून येथील एका वाड्याच्या माती खोदाईत सातशे वर्षांपूर्वीचा शिलालेख, विहीर, भुयार, नक्षीकाम केलेले कोरीव दगड व धान्य साठविण्याचे बांधकाम केलेले तळघर आढळून आले आहे. सध्या येथील ऐतिहासिक वास्तूंचे नागरिकांना दर्शन होत आहे. शिलालेख पाहण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांनी गर्दी केली आहे.

येथील सरदारांच्या वाड्याभोवती उंच ऐतिहासिक गढी असून तीन बाजूंना बुरूज व एका बाजूला वाड्याचे आकर्षक प्रवेशद्वार आहे. गढीवरील माती खोदताना जेसीबीने एक मोठा दगड निघाला असून त्याच्या खालच्या बाजूला मोठे तळघर आहे. सदर सपाट व आयताकृती दगडावर ऐतिहासिक शिलालेख लिहिलेला आहे. सध्या सदर शिलालेखाचा दगड येथील ढमढेरे परिवाराने वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभा केलेला आहे. तसेच येथील गढीवर तीन दिशेला उंच बुरूज असून पूर्वेच्या बाजूला ऐतिहासिक विहीर (आड) दिसत आहे. विहिरीचे बांधकाम विटामध्ये केलेले असून ते खोलवर दिसत आहे. विहिरीच्या वरच्या बाजूला आकर्षक दगडांचे बांधकाम आहे. तसेच विहिरीच्या शेजारी जवळच भुयार असून ते आतून स्वच्छ व सध्या वापरात असल्यासारखे दिसत आहे. सध्या येथील ढमढेरे परिवाराने वाड्याचे खोदकाम थांबविले आहे.

दरम्यान, तळेगाव ढमढेरे गावच्या चारही बाजूंनी पुरातन काळातील तटबंदी असून येथे अनेक ऐतिहासिक राजवाडे व गढी आहेत. तसेच तळेगावात अनेक देव-देवतांची पुरातन मंदिरे असून सध्या सर्व मंदिरांची देखभाल ग्रामस्थ मनोभावे करीत आहेत. पुरातन मंदिराच्या वास्तू जतन करण्याचे काम ग्रामस्थ करीत आहेत. अनेक पुरातन मंदिरांमुळे गावच्या ऐतिहासिक वैभवात भर पडली असून इतिहास संशोधकांना पुरातन वास्तूंची संशोधनासाठी पर्वणीच मिळाली आहे. गावाला पुरातन इतिहास असल्याने इतिहास अभ्यासकांनाही येथील ऐतिहासिक भूमीचा उपयोग होणार आहे. आतापर्यंतच्या संशोधकांच्या अभ्यासावरून गावातील अनेक ऐतिहासिक बाबी पुढे आलेल्या आहेत.

Web Title: Inscription Historical Place Tourist