गुंजवण्यात पाणवठ्यात आढळले कीटकनाशक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

गुंजवणे - गुंजवणे (ता. वेल्हे) येथील दलित वस्तीतील पाणवठ्यात कृषी कीटकनाशक मिसळल्याचे आढळून आले. तसेच, पाण्यावरील तवंग व त्याचा वास ग्रामस्थांना पाणी भरताना आल्याने दुर्घटना टळली. पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने वस्तीतील महिलांना डबके खोदून पाणी भरावे लागत आहे.

गुंजवणे - गुंजवणे (ता. वेल्हे) येथील दलित वस्तीतील पाणवठ्यात कृषी कीटकनाशक मिसळल्याचे आढळून आले. तसेच, पाण्यावरील तवंग व त्याचा वास ग्रामस्थांना पाणी भरताना आल्याने दुर्घटना टळली. पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने वस्तीतील महिलांना डबके खोदून पाणी भरावे लागत आहे.

गुंजवणे येथे सरपंच अंजना निढाळकर यांच्या जागेत पिढीजात पाणवठा आहे. या पाणवठ्यावरून दलित वस्ती व गावठाण येथील महिला पिण्यासाठी पाणी नेतात. या पाणवठ्याला लागूनच निढाळकर यांचे शेत आहे. भात खेकडे खात असल्याने त्यांनी शेतात कृषी कीटकनाशक टाकले होते. ते विरघळून पाणवठ्यात उतरले. सकाळी पाणी भरायला गेलेल्या महिलांना पाणी गढूळ व त्याचा वास येत असल्याचे आढळले. शेतात कीटकनाशक टाकले आहे का, हे पाहण्यासाठी गेले असता पाणवठ्याच्या कडेने कीटकनाशक आढळले.

खेकडांच्या छिद्रातून हे पाणी पाणवठ्यात जात असल्याचे दिसले. त्यानंतर संबंधितांनी ग्रामस्थांना या पाणवठ्यावरून पाणी न भरण्यास सांगितले. 
हा पाणवठा दूषित झाल्याने महिलांना माळरानात डबकी खोदून पाणी भरावे लागत आहे. गावात दलित वस्तीसाठी स्वतंत्र पाणी योजना व्यवस्था आहे.

या योजनेचे गावठाण व लिम्हणवाडी यांना पाणी मिळते. मात्र, आठ वर्षांपासून इंदिरा नगरला पाणी मिळालेले नाही, तर मुख्य वस्ती दोन वर्षांपासून पाणी बंद आहे. ग्रामसभेत सांगितल्यास वस्तीतील सर्वांना घरपट्टी भरण्यास सांगितले जाते. मात्र, या घटनेचे गांभीर्य ना सरपंचांना आहे, ना ग्रामसेवकांना. सरपंच पुण्यात राहत असल्याने, ग्रामसेवक फक्त राजकीय आश्वासने देऊन वेळ मारून नेतात. पावसामुळे वाटा निसरड्या झाल्याने एक किलोमीटरवरील गावकीच्या विहिरीवरून महिलांना हंडा घेऊन जाणे अशक्‍य आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, पाणवठा परिसरात कीटकनाशक टाकण्यास बंदी घालावी. या पाण्याची तपासणी करून आम्हाला पाणी मिळण्याची व्यवस्था करावी; अन्यथा रिपब्लिकन पक्षातर्फे पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे पक्षाचे वेल्हे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, विशाल आल्हाट, कचरू सोनवणे यांनी सांगितले.

गुंजवण्यात आढळलेले कीटकनाशक खाण्यात आल्यास डोके दुखणे, चक्कर येणे, घबराट होणे, उलटी होणे, अंधूक दिसणे, घाम येणे, डोळ्यांतून पाणी येणे व तोंडातून लाल द्रव वाहू लागतो. याच्या अतिसेवनामुळे माणूस दगावण्याची शक्‍यता असते. शेतात वापरल्यास ते लवकर नष्ट होत नाही, त्याचा परिणाम अनेक महिने राहतो.

Web Title: Insecticide receive in water