कॉलेजचा सुरक्षारक्षक त्याच कॉलेजमध्ये करतोय Phd, पुण्याच्या विक्रमच्या जिद्दीचा प्रवास

गावाला एक एकर शेती अन् तीही कोरडवाहू.
pune
punesakal

-छाया काविरे

ज्या शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशद्वारावर तो तरुण एकेकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्रीचा पहारा देत असे, त्याच संस्थेत त्याला आता पीएच. डीसाठी प्रवेश मिळाला आहे! 'या संस्थेत अत्युच्च शिक्षण घ्यायचे,' असे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते... आणि, आता ते स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दिशेेने पहिले पाऊल पडले आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे संकटांना चकवा देत यशाच्या पायऱ्या चढत चाललेल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणाची, म्हणजेच विक्रम मालन आप्पासाहेब शिंदे याची.

सेनापती बापट रस्त्यावरील 'सिम्बायोसिस' या शैक्षणिक संस्थेत विक्रम रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करत असे. आता तो याच संस्थेत 'पुणे शहरातील उत्पादन कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांच्या प्रभावाचा अभ्यास' या विषयात पीएच.डी. करणार आहे.

मनात उच्च शिक्षणाचे ध्येय आणि डोळ्यांत नवी स्वप्ने घेऊन विक्रम सात वर्षांपूर्वी वेळू (ता. कोरेगाव, जि. सातारा) या त्याच्या गावाहून पुण्यात आला. घरच्या गरिबीमुळे पूर्ण वेळ शिक्षण करणे त्याला शक्य नव्हते. मग रोजचा उदरनिर्वाहही करता यावा आणि शिक्षणही पुढे सुरू राहावे यासाठी रात्री सुरक्षारक्षकाचे काम करत तो दिवसा शिक्षण घेऊ लागला.

गावाला एक एकर शेती अन् तीही कोरडवाहू. आई-वडिलांनी मजुरी करून घराचा गाडा चालवला होता. अशा वेळी 'कमवा व शिका' योजनेतून त्याने साताऱ्यातील 'यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज'मधून फिजिक्समध्ये बीएस्सी केले. विक्रमला कवितांचीही आवड. त्यामुळे तो बऱ्याचदा प्रॅक्टिकल सुरू होण्याआधी त्याच्या रफ बुकमध्ये कविता लिहीत बसलेला असायचा. कवितेची गोडी त्याला महाविद्यालयीन जीवनापासूनच लागली. कविता आणि वक्तृत्वस्पर्धा ही दोन आवडीची क्षेत्रे. कौटुंबिक-आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसली तरी परिस्थितीचे भांडवल न करता तो टप्प्याटप्प्याने यश मिळवत राहिला व जगण्याची लढाई लढत राहिला.

पदवीनंतर अवघ्या एकविसाव्या वर्षी त्याने स्वतःचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला. ‘श्वास ओला’ असे त्याचे नाव. त्यानंतर पुण्यातील 'मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज'मध्ये वकिलीच्या शिक्षणासाठी त्याने प्रवेश घेतला.

पुण्यासारख्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आलेला विक्रम काही काळ शहरी वातावरणाला बुजायचा. कावराबावरा व्हायचा. त्याला न्यूनगंड यायचा. आपल्याला नक्की काय करायचंय, अशीही त्याची द्विधा मनःस्थिती व्हायची. तशातच काही अडचणींमुळे कायद्याचे शिक्षण त्याला अर्ध्यातूनच सोडावे लागले. मग या काळात कुटुंबाची आर्थिक जबाबदारी स्वीकारून त्याने सुरक्षारक्षक म्हणून रात्रीच्या वेळी काम करायला सुरुवात केली. पुण्याच्या सुखवस्तू परिसरात असलेल्या सिम्बायोसिस कॉलेजच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक म्हणून काम करण्याचा त्याचा प्रवास २०१६ मध्ये सुरू झाला.

रात्री हे काम करायचे आणि दिवसा स्वतःचा छंद जोपासायचा हा त्याचा नित्यनेम. बऱ्याचदा लग्नसमारंभात किंवा अन्य मंगलकार्यात केटरिंगसंदर्भातील सेवा पुरवायलाही तो जात असे. वेळ मिळेल तसे सामाजिक चळवळींमध्ये झोकून काम करण्याची आवडही त्याला होती. समोर कोणताही प्रसंग आला तरी त्या प्रसंगाला सर्वशक्तीनिशी सामोरे जायचे, असा त्याचा प्रणच असायचा.

'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'तर्फे आयोजित ‘संविधानजागर यात्रे'ने विक्रमच्या आयुष्याला कलाटणी दिली. चळवळीमुळे त्याचे सामाजिक भान विस्तारत गेले. पुढे 'जाणीवजागृती फाउंडेशन'च्या माध्यमातून तो काम करत राहिला. शिक्षण, रोजगार या विषयांवर काम करता करता ‘अस्वस्थ’ हा त्याचा दुसरा काव्यसंग्रह आकारास आला. दरम्यान, साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्याशी त्याची ओळख झाली. आपल्या कविता त्यांना दाखवून, त्या तपासून घेऊन तो साहित्यक्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करू लागला. घरगुती अडचणी या काळातही कमी नव्हत्याच; पण तो लढत राहिला. यानंतर 'समाजबंध' नावाच्या उपक्रमाशी तो संलग्न झाला. स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भात आणि सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत जनजागृती करणाऱ्या मोहिमेत तो अग्रस्थानी राहिला. हे सगळे करताना सुरक्षारक्षक म्हणून त्याची रात्रीची नोकरी सुरूच होती.

सामाजिक चळवळींमध्ये काम केल्यानंतर विक्रमला 'एमएसडब्ल्यू' करण्याची इच्छा झाली. आपण करत असलेल्या कामाला विधायक स्वरूप द्यायचे म्हटले तर योग्य शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मनाशी ठरवून विक्रमने 'एमएसडब्ल्यू' पूर्ण केले. उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याने त्याच्या काही कविता सादर केल्या.

दोन वर्षांपूर्वी कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे सारे जग घरी असताना विक्रम मात्र आपले घर व्यवस्थित चालावे म्हणून धोका पत्करून पुण्यात राहत होता. सन २०२० मध्ये ‘अक्षरदीप’ हा ई-दिवाळी अंक त्याने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केला आणि संपादक म्हणूनही तो साहित्यक्षेत्रात/प्रकाशनक्षेत्रात काम करू लागला.

पुढे फेब्रुवारी २०२१ मध्ये तो ‘सेट’ परीक्षाही उत्तीर्ण झाला आणि आता तर थेट पीएचडी.साठीच त्याने प्रवेश मिळवला आहे. गावी शेतात रमणारा, मोकळ्या वेळेत कविता लिहिणारा आणि कामाच्या वेळेत कामाकडे पूर्ण लक्ष देणारा असा हा विक्रम. साहित्याक्षेत्राबरोबरच प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या विक्रमचे लढत लढत जगणे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावे!

" सुरक्षरक्षकाचे काम करत असताना अनेक छोट्या-मोठ्या प्रतिकूलतांना सामोरे जावे लागले.

पावसात उभे राहून काम करावे लागणे, अपुरी झोप वगैरे. रात्री कित्येक वेळा पावसात छत्री घेऊन मी सुरक्षारक्षकाचे काम केले आहे. केवळ चार तास झोप घेऊन दिवसभर शिक्षण घेत असे. मात्र, आता पीएच. डीला प्रवेश मिळाल्याने कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटते. असंघटित कामगारांचे खूपच गंभीर प्रश्न आहेत. या कामगारांसंदर्भात पुढे संशोधन करायचे आहे.

त्या क्षेत्रात हातून काही विधायक घडावे यासाठीच ही माझी धडपड सुरू आहे."

- विक्रम मालन आप्पासाहेब शिंदे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com