स्वप्नांचा यशस्वी पाठपुरावा

Aditi-Bhosale Valunj
Aditi-Bhosale Valunj

भरपूर परिश्रम आणि चिकाटीनंतर आम्ही असे तंत्र विकसित केले की, जे डिझेल खरेदी व्यवस्थापकास मोबाईल फोनच्या एका चुटकीसरशी डिझेल ऑर्डर करण्याची सुविधा देते. तसेच, कोणत्याही वेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते वितरित केले जाऊ शकते.

काहीतरी विशेष करण्यासाठीच माझा जन्म झाला असून काहीतरी महान घडणे हा माझ्या आयुष्याचा उद्देश आहे, असा विश्वास मी नेहमी बाळगत आली आहे. त्यामुळेच रसायनशास्त्र, फॉरेन्सिक असे शिक्षण घेऊनही मला मात्र उद्योजकतेमध्ये विशेष स्वारस्य वाटू लागले. या प्रांतात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण करण्याचा माझा प्रयत्न सुरू होता. त्याच सुमारास माझा विवाह झाला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझा पती चेतन याने माझ्या ध्येयाला अधिक बळकटी दिली.

चेतनशी लग्न झाल्यावर अनायासे मी आमच्या कुटुंबाच्या मालकीच्या पेट्रोलपंपला भेट देत असे. सततच्या निरीक्षणाने मला जाणवले की डिझेल खरेदीसाठी मोठ्या व्यावसायिकांना आणि उद्योजकांना त्रासदायक प्रक्रियेतून जावे लागते आणि विनाकारण संघर्ष करावा लागतो. डिझेलसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करणे, एक-दोन माणसे त्या कामासाठी जुंपणे, डिझेलचे बॅरल हाताळताना होणाऱ्या गळतीचे नुकसान सोसणे, वाहतुकीसाठी खर्च करणे आणि चोरी व भेसळीची जोखीम पत्करणे, या गोष्टी साधारणपणे सध्याच्या व्यवस्थेत घडत आहेत. यात इंधनही खूप वाया जाते. या प्रक्रियेतून ग्राहकांची सुटका व्हावी, यावर आम्ही विचार करू लागलो.

थोड्याशा संशोधनानंतर मला कळले की, या अनियंत्रित डिझेल वाहतुकीमुळे होणाऱ्या गळती व अन्य प्रकारच्या नुकसानामुळे दरवर्षी भारत ७ लाख कोटी रुपये गमावतो. कंपन्यांच्या आणि मोठ्या व्यवसायांच्या या अनियंत्रित प्रकारच्या खरेदी पद्धतीमुळे ते लोक त्यांच्या एकूण इंधनखरेदीचा सुमारे १० टक्के हिस्सा गमावतात. हे समजल्यावर आम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसला. तेव्हाच आम्ही यात बदल करण्याचे मनाशी पक्के केले. देशभरात डिझेल वितरण आणि व्यवस्थापन प्रक्रिया आमूलाग्र पद्धतीने, बदलण्याची मनीषा आम्ही बाळगली.     

या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणून जुलै-२०१७ मध्ये रिपॉज एनर्जीची अधिकृतपणे स्थापना झाली. तसेच, आमच्या उद्योजकतेच्या प्रवासाचीही सुरवात झाली. आमच्या स्वप्नांच्या अनुषंगाने करावयाच्या सर्व प्रयत्नांबद्दल आम्ही विचार केला आणि त्यानंतर आमचे आम्हालाच जाणवले की, स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही अस्वस्थ आहोत. मग या कामात आम्ही स्वतःला झोकून दिले. अर्थात, आतापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. आमच्या सभोवतालच्या अनेक शंकाखोर आणि धीम्या लोकांसह आम्ही हळूहळू आणि सातत्याने वाटचाल करत आमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा एक संघ तयार करण्यात यशस्वी झालो. आम्ही दोघे वारंवार एक गोष्ट सांगतो, की हा व्यवसाय लोकांसाठी आहे. परिणामी, आमचा ग्राहक आणि आमचा कार्यसंघ आमच्या व्यवसायातील सर्वांत मोठी मालमत्ता आहे.

भरपूर परिश्रम आणि चिकाटीनंतर आम्ही असे तंत्र विकसित केले की, जे डिझेल खरेदी व्यवस्थापकास मोबाईल फोनच्या एका चुटकीसरशी डिझेल ऑर्डर करण्याची सुविधा देते. तसेच, कोणत्याही वेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते वितरित केले जाऊ शकते. संरचना उद्योगांसाठी डिझेल पुरविणे सोपे करते आणि त्यांचा मौल्यवान वेळ आणि पैसा वाचवते. शिवाय, या तंत्रामुळे इंधन वाचते आणि प्रदूषण कमी होते. या तंत्रामुळे उद्योगांना नियोजनबद्ध आणि अधिक उत्पादनक्षम बनविण्यास मदत झाली. अशा प्रकारे रिपॉजच्या, इंधन व्यवस्थापनाचा चेहरामोहरा बदलण्याच्या स्वप्नाची सुरवात झाली. आमच्या नवउद्योगाच्या या वाटचालीत मला हे समजले, की कुठल्याही समस्येवरचा उपाय हा फार संशोधनात्मक असला पाहिजे, असे नाही. मात्र, सध्याच्या समस्येतून मार्ग दाखविणारा तो सर्वांत जास्त उपयुक्त उपाय असला पाहिजे. ऑनलाइन खाद्यपदार्थ खरेदी करणे, ही काही फारशी निराळी गोष्ट नव्हती. परंतु खाद्यपदार्थ घरपोच करणारे ॲप्स आले आणि त्यांनी खाद्यपदार्थ बनविणाऱ्या उत्पादकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणले. या ॲप्सची कल्पना फार नावीन्यपूर्ण नव्हती; पण तिने खाद्यपदार्थ घरी मागविण्याच्या गरजेसाठी प्रभावी साधन दिले.

त्याप्रमाणेच डिझेल विक्रीच्या नव्या सुविधेमुळे आम्ही राजलक्ष्मी पेट्रोल पंपाकडून रिपॉज एनर्जीपर्यंत जो प्रवास केला तो आनंददायी झाला. आम्ही जे काम करू शकलो, त्याने आमचा स्वतःवरचा विश्वास बळकट केला आणि सध्याच्या कामकाजाच्या स्वरूपात सुधारणा करण्याचा दृष्टिकोन देऊन व्यवसायात आमची मदतही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com