आजारावर मात करून वकिलीत यश

Gayatri-Kale
Gayatri-Kale

आमच्यात पती-पत्नी नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक असल्याने एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. पतीसारखा जोडीदार मिळाला, हे माझे भाग्य समजते. देवाकडे एकच मागणी असून पुढचा माझ्या आयुष्यातला प्रवास माझ्या पतीबरोबर आनंदाचा व सुख-समाधानाचा राहणार आहे आणि राहो.

माझे माहेर बारामती तालुक्‍यातील वाणेवाडी सोमेश्‍वरनगर. वडील (कै.) रमेश शिवराम शेळके यांच्या इच्छेमुळे वकिली क्षेत्रात आले. वकील होऊन कोर्टात जाऊन केसेस चालवाव्यात ही त्यांची सुप्त इच्छा.

१९९३ मध्ये पुण्यातील सिंबायोसिस कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर (कै.). ॲड शिवाजीराव ताकवणे यांच्याकडे वकिली सुरू केली. १९९६ मध्ये घोडेगावचे (ता. आंबेगाव) ॲड. मुकुंदा भगवंतराव काळे यांच्याबरोबर विवाह झाला. संसार व मुले यांची जबाबदारी प्रथम असे मानून वकिली करणे बंद केले. ५ ते ६ वर्षांनंतर पती व सासूबाईंमुळे सन २००२ पासून घोडेगाव न्यायालयात पुन्हा वकिली सुरू केली. 

वकिली म्हणजे महिलांसाठी एक आव्हान असते. त्यातून ग्रामीण भाग. वकिली करताना तुम्ही २४ तास त्यासाठी दिले तरी कमी पडतात. महिला वकील म्हटल्यावर पक्षकार येण्याची शक्‍यता खूपच कमी. परंतु पतीचे प्रोत्साहन व साथीमुळे १० वर्ष वकिली करून स्थिर झाले. 

२०१२ पासून वेगवेगळ्या शारीरिक आजारांना अनपेक्षितपणे सामोरे जावे लागले. २०१२ मध्ये सायंकालीन कोर्ट सुरू झाले. रात्री साडेनऊपर्यंत कामकाज चालायचे. रात्री गाडीवरून घरी येताना मला समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाइटभोवती सर्कल दिसून गाडी चालविताना अडचण येऊ लागली. डॉ. सचिन गाडे यांच्याकडे मंचरला डोळे तपासणीसाठी गेले. मला डोळ्यांचे प्रेशर खूप जास्त प्रमाणात वाढल्याचे सांगितले. त्याक्षणी वकिली थांबवावी लागेल या विचारानेच अस्वस्थ झाले. तपासणीमध्ये उजव्या डोळ्याची दृष्टी ८० टक्के गेल्याचे व डाव्या डोळ्याची दृष्टी ८० टक्के असल्याचे समजले. संपूर्णपणे व्यवसाय डोळ्यावर व तिथेच मोठा दोष निर्माण झाल्याने कधीच वकिली करू शकणार नाही या विचाराने आयुष्यच थांबल्यासारखे वाटले. 

दोन्ही डोळ्यांची एकूण ७ ऑपरेशन झाली. ग्लुकोमाचे व ऑपरेशन करणारे डॉ. राजुल पारेख (मुंबई), डॉ. सचिन गाडे (मंचर) रेटिनाचे ऑपरेशन करणारे डॉ. सचिन काबरा (पुणे) देवदूत ठरले. त्यांनी मानसिक आधार देऊन औषधोपचार केले. आजही करत आहेत. २०१८ पर्यंत वेगवेगळ्या शारीरिक आजारांना सामोरे जावे लागले. २०१६ मध्ये पुन्हा मोठ्या आजाराला सामोरे जाण्याची वेळ आली. पोटदुखीने त्रस्त झाले होते. सोनोग्राफी केली उजव्या किडनीला गाठ दिसून आली. गाठ ऑपरेशन करून काढली. गाठ कॅन्सरची असल्याचे निदान झाल्याने खचून गेले. गाठीचे ऑपरेशन करणारे डॉ. भालचंद्र कश्‍यपी (पुणे) यांचा आधार महत्त्वाचा ठरला. ऑपरेशन व औषधोपचाराने पूर्णपणे बरी झाले. कॅन्सरसारख्या आजाराबाबत नशीबवान ठरले. कॅन्सरची first step असल्याचे निदान झाले. माझा पुनर्जन्म झाला. त्यानंतरही मला मोठे आजार झालेत. प्रत्येक वेळी लवकर निदान झाल्याने त्यावर उपचार घेऊन आनंदाने सामोरे जाऊन सुखरूप बाहेर येत आहे. यशस्वीरीत्या वकिली करत आहे.

२०१२ पासूनच्या आजारपणाच्या अडथळ्यामुळे वकिली बंद होणार अशी भीती वाटत होती. पती मुकुंदा, सासू सासरे, तीन नणंदा, दोन मुले, माझी आई बहीण भाऊ वाहिनी, मावस सासू पतीची मामे बहीण, मैत्रिणी, वकील सहकारी, वकील दीर आमचे मा. न्यायाधीश साहेब, माझे पक्षकार, बाई मंगल, सर्व डॉक्‍टरांच्या सहकार्याने, मानसिक आधारामुळे आलेल्या प्रत्येक आजाराला धीराने सामोरी गेली. सगळ्यांचे माझ्यावर खूप ऋण आहेत. त्यांची उतराई या जन्मात तरी शक्‍य नाही.

सध्या वकिली छान सुरू आहे. घोडेगाव पोलिस स्टेशनमध्ये महिला दक्षता कमिटीची सदस्य असून महिलांचे हक्क, अधिकार व कायद्याकरिता काम करते. देव माझ्या पाठीशी नसून माझ्याबरोबर आहे. तो मुकुंदाच्या स्वरूपात माझ्याबरोबर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com