जिद्दीने केली शाळेची स्थापना

Jayashri-Gargote
Jayashri-Gargote

खेड तालुक्‍यातील एका ध्येयवेड्या सबलेने दहा वर्षांपूर्वी जनावरांच्या गोठ्याला, तसेच ग्रामदैवताच्या मंदिराला वर्गखोली मानून स्वतःची इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. सध्या या स्कूलच्या ४१ वर्गखोल्यांमध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील ११२९ विद्यार्थी इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत.

लहान वयात लग्न झालं. सासरे श्री. विष्णू पांडुरंग गारगोटे यांनी पुढील शिक्षणासाठी कॉलेजला जाण्यास परवानगी देऊन माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. एकत्रित कुटुंबात जबाबदाऱ्या पेलताना कॉलेज करणं जमलं नाही; पण हार मानली नाही. घरीच अभ्यास करून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी एनसीआरडीची नालंदा स्कूल येथील नोकरीने करिअरची सुरवात केली. परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजीमधून शिक्षण मिळालं पाहिजे, हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. घरचा विरोध असतानाही कडूस येथे स्वतःची शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 

नोकरी करावी, शाळा चालवणं आपलं काम नाही, एकतर त्यासाठी मोठं भांडवल किंवा सामाजिक प्रतिष्ठा असावी लागते, असं घरच्यांचं मत होतं. परंतु आमचे मानस बंधू श्री. पंडित लक्ष्मण मोढवे हे श्रीकृष्णासारखे पाठीशी उभे राहिले. कडूस येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचं ठरलं. पहिल्या वर्षी घरोघरी फिरून आसपासची २० मुलं जमा केली आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या २ खोल्यांमध्ये ३ ऑगस्ट २००८ रोजी डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलची मुहूर्तमेढ रोवली. ‘वन मॅन आर्मी’नुसार सर्व कामं एकटीनेच केली. शिक्षक, मदतनीस सर्व काही मीच. 

पहिलं वर्ष पार झालं. पालकांना विश्वास पटल्याने दुसऱ्या वर्षी प्रतिसाद वाढला. आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरची मुलं जमा झाली. यावेळेस विद्यार्थ्यांचा आकडा वाढला. १०५ झाला. मग शिक्षक, मदतनीस हाताशी घेऊन प्रवास सुरू केला. तिसऱ्या वर्षी १० ते १५ किलोमीटर अंतरावरून मुलं येऊ लागली. पाईट, आंबोली गावांतून मुलांचा ओघ वाढला. सन २०११ मध्ये पाईटच्या माजी सरपंच सौ. अलकाताई सतीश भोकसे यांनी मुलांना कडूसला पाठवायचं लांब पडतं. आता पाईटमध्ये एक शाखा सुरू कर, असा आग्रह केला. घरच्यांशी चर्चा करून शाळेची दुसरी शाखा १ जून २०११ला पाईट येथे सुरू केली. पहिल्याच वर्षी जागेचा प्रश्न होता. भोकसे यांच्या मालकीच्या गोठ्यालाच वर्गखोली केलं अन्‌ शाळेतील श्रीगणेशाला सुरवात केली.

पालकांचा विश्वास आणि दर्जेदार शिक्षण यामुळे हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत गेली. सध्या कडूस येथील २७ वर्गखोल्यांमध्ये ८०८, तर पाईट येथे १४ वर्गखोल्यांमध्ये ३२१ असे एकूण ११२९ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना मोफत शिक्षणाची सोय केली. पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना येणारी अडचण म्हणजे दुसऱ्या प्रकाशनाची पुस्तकं. त्यासाठी पूर्व प्राथमिक वर्गासाठी स्वतःचा नवीन अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ‘डायनॅमिक किड्‌स’ हा पुस्तकांचा संच प्रकाशित केला. ते करत असताना प्रकाशन कोण देणार, मग स्वतःच पूर्वा पब्लिकेशन नावाने संच प्रकाशित केला. मंदिरात व गोठ्यात सुरू केलेली शाळा. आता त्याच शाळेत संगणक लॅब, ई-लर्निंग, सायन्स लॅबसह ४२ वर्गखोल्या, तसेच भव्य मैदान सर्वकाही आहे. पालकांच्या मनात खंत असायची, इंग्रजी माध्यमाची मुलं स्कॉलरशिप परीक्षेमध्ये झळकत नाहीत.

पण मागील वर्षी ७ विद्यार्थी मेरिटमध्ये झळकले अन्‌ या विचारांना मोडीत काढलं. या वर्षी ‘साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक’ पुरस्कार देऊन मला गौरविण्यात आल्याने आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे. या प्रवासात प्रत्येक स्तरावर अडचण येत गेली. त्यातून मार्ग काढला. यामध्ये सर्वात जास्त त्याग असेल तर तो माझ्या दोन मुलींचा. आय.टी. इंजिनिअर होऊनही शाळेत शिकवायला तयार झालेली आणि त्यासाठी बी.एड.लादेखील प्रवेश घेतलेली मोठी मुलगी रविना आणि स्कूल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेली लहान कन्या पूर्वा. पती श्री. प्रतापराव विष्णू गारगोटे यांची खंबीर साथ मिळत गेली आणि मिळत आहे. स्त्रियांनी राखीव जागेची वाट न पाहता स्वतःचीच अशी एक जागा राखून ठेवून अस्तित्व निर्माण करावं. समाजाला दोष न देता समाजाशी एकरूप होऊन समाजाच्या ऋणात राहावं व आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य पाडावं, असं मनोमन वाटत असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com