सकारात्मक वृत्तीमुळेच समाज कार्यात तत्पर

Manisha-Valse-Patil
Manisha-Valse-Patil

ग्रामीण व शहरी जीवनाचा समतोल साधत जीवन आनंददायी बनविणे प्रत्येक अडचणीकडे संधी म्हणून पाहणे, आव्हान स्वीकारणे, समाजोपयोगी कार्य करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणं, व्यवसायाचा विकास साधणं, ही सर्व ऊर्जा प्राप्त झाली ती फक्त सकारात्मक मनोवृत्तीमुळेच.

ग्रामीण संस्कृतीतून शहरी संस्कृती आणि पुन्हा ग्रामीण संस्कृती हा प्रवास नक्कीच तारेवरची कसरत. पण ते मी अनुभवलंय. माझे बालपण तसे अस्सल ग्रामीण संस्कारात वाढलेले. परंतु, माझे वडील शिवराम काशिनाथ थोरात हे नोकरीनिमित्त पुणे परिसरात होते. त्यामुळे साहजिकच महाविद्यालयीन जीवनापर्यंत माझा प्रवास म्हणजे पुणेकर, जरी शहरी वातावरणात वाढले तरी उन्हाळी व दिवाळी सुटी आली की जायची तयारी असायची ती मातृभूमीकडे अर्थात निरगुडसरला. 

गाव आणि शहर यांचा समतोल साधत मी विज्ञान शाखेची सूक्ष्म जीवशास्त्र विषयातील पदवीधर झाले. तशी मी माझ्या कुटुंबातील पहिले अपत्य. माहेर-आजोळ यांची त्यामुळे लाडकी. कदाचित माझे वडील आणि आई विमल यांची इच्छा असेल की पहिली मुलगीच हवी, त्यामुळेच माझे नाव ठेवले असेल ‘मनीषा’.

नावाप्रमाणे ईश्‍वरकृपेने सर्व सामाजिक कौटुंबिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मला बळ मिळाले ते म्हणजे आमचे हे माझे पती रवींद्र जनार्दन वळसे पाटील. २१ वर्षापूर्वी आमची जोडगोळी सांसारिक जीवनात उदयास आली. माझे पती स्वभावाने विनोदी, हरहुन्नरी; पण तसे कामात काटेकोर. आमच्या संसाराला नेहा नावाचे गोंडस फूल सन २००० मध्ये लागले. पूजा हे माझे दुसरे अपत्य. 

माझे माहेर आणि सासर दोन्हीकडे समाजसेवेचा वसा. माझे चुलते नामदेव थोरात हे प्रसिद्ध उद्योजक. माझे सासरे जनार्दन वळसे पाटील हेदेखील व्यवसायात प्रगतिशील. तंत्रज्ञानाची कास धरणारे. या सर्वांच्या महत्त्वाकांक्षेने आणि अथक प्रयत्नातून आज आमचा दुग्ध व्यवसायातील ‘सारथी’ ब्रॅण्ड लोकसेवेसाठी सदैव तत्पर असतो. या उद्योगाच्या निमित्ताने अधून मधून वेळ मिळाल्यास तेथील कामाचा अनुभव घेण्याचा मी प्रयत्न करते. माझ्या पतीचा कन्स्ट्रक्‍शनचा व्यवसाय असल्याने सर्व स्तरातील लोकांचा राबता आमच्याकडे असतो. बांधकाम व्यवसायामुळे यंत्रणाही तेवढी अवाढव्य आली. त्यामुळे पती कामात सदैव व्यस्त. घरदार सांभाळून आपलीही खंबीर साथ परिवारास मिळावी हा माझा प्रयत्न. त्या अनुषंगाने मी आजही मोठ्या आत्मविश्वासाने व्यवसायाचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळते. त्यामुळे समाजाशी नाते घट्ट होण्यास मदत मिळाली. दोन वर्षापूर्वीच आम्ही डांबर प्रकल्प सुरू केला. त्यामुळे अजूनच व्याप वाढला. माझी सहकार्यातील भरारी पाहून मोठी जबाबदारी पतीने माझ्यावर सोपवली. 

हे सर्व करत असताना समाजकार्याचा वसा विसरून कसे बरे चालेल. गेली दहा वर्ष मी ‘इनरव्हील’ची सक्रिय सदस्या आहे. त्या माध्यमातून नवीन प्रकल्प आणि महिला सबलीकरणाचा प्रयत्न. गावातील निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहिला. महिलांशी संबंधित ज्वलंत प्रश्न म्हणजे गॅस. गावातच गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावा यासाठी इंडियन गॅस एजन्सी सुरू केली. त्यामुळे तत्परतेने सेवा कशी द्यावी याचा अनुभव मला जीवनात मिळाला. 

कामाचा व्याप, धावपळ, समाजसेवा ही तर मानवी जीवशैलीची अंगे. परंतु, यासाठी सक्षम राहण्यासाठी व ऊर्जा निर्माण करण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहाराची मी सवय लावली आहे. ही सर्व कर्तव्ये पार पाडत असताना मुलींचे शिक्षणही तितकेच महत्त्वाचे. आज नेहा वाणिज्य शाखेत पहिल्या वर्गात तर पूजा सातवीत शिकते. दोघींचे सकाळी उरकून घेणे, शाळेतील पालक सभा हे सर्व काटेकोर सांभाळावे लागते. त्यांच्या विविध आवडी निवडी जोपासणे, आवश्‍यक शैक्षणिक गरजा पुरविणे या सर्व गोष्टी आनंदच देतात. या सर्व यशामागे माझे सासरचे आणि माहेरचे सर्व सदस्य माझ्यामागे सावलीसारखे उभे राहिले. हे तर माझ्या यशाचे गुपित मी मानते.

ग्रामीण व शहरी जीवनाचा समतोल साधत जीवन आनंददायी बनविणे प्रत्येक अडचणीकडे संधी म्हणून पाहणे, आव्हान स्वीकारणे, समाजोपयोगी कार्य करणे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडणं, कौटुंबिक व्यवसायाचा विकास साधणं, ही सर्व ऊर्जा प्राप्त झाली ती फक्त सकारात्मक मनोवृत्तीमुळेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com