कुटुंबाच्या पाठिंब्याने ‘ग्रो ग्रेन’ची भरारी

Netra-Shaha
Netra-Shaha

मला इंग्लिश स्कूल चालविण्याचा अनुभव होता. त्याचा उपयोग नालंदा स्कूलसाठी झाला. नालंदामध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मी उभारलेल्या ग्रो ग्रेन हा सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पही आज भरारी घेत आहे.

कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माझा जन्म झाला व बालपणीही तेथे गेले. त्या वेळी तेथे इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हती. माझे शिक्षण कसे व कोठे होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. वडील जयंतीलाल शहा यांनी पुढाकार घेऊन बिल मेमोरिअल रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. इतरांच्या मुलांप्रमाणेच त्यामुळे माझ्या शिक्षणाचाही प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर पुण्यात एसएनडीटी महाविद्यालयात बीएस्सी पर्यंत शिक्षण घेतले.

मेमोरिअल स्कूलची जबाबदारी मी सांभाळत होते. या स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून केलेल्या प्रयत्नांना वडिलांनी सतत पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिले. वडील रोटरी क्‍लबमध्ये तर आई ज्योती जयंतीलाल शहा या इनरव्हीलच्या प्रेसिडेंट होत्या. त्यांनीही अनेक सामाजिक उपक्रम इनरव्हीलच्या माध्यमातून गावोगावी राबविले. मी ही त्यांच्याबरोबर कार्यरत होते. सामाजिक कार्याचे बाळकडू मला माहेरीच मिळाले होते. 

१९९५ मध्ये मंचर येथील प्रीतम प्रकाशशेठ शहा यांच्या बरोबर विवाहबद्ध झाले. त्या वेळी मंचर हे खेडेगावच होते. मी किचनमध्ये काम करत होते. त्या वेळी सासरे प्रकाश शेठ मला म्हणाले, ‘‘किचनमध्ये काम करणारे खूप आहेत. तुझे चांगले शिक्षण असल्याने तू गोवर्धन दूध प्रकल्पात लक्ष दे.’’ या सूचनेला सासू रजनीबेन व आजेसासू प्रभावतीबेन यांनीही पाठिंबा दिल्याचे पाहून मलाही मनस्वी आनंद झाला. सासरे प्रकाशशेठ व कुटुंबीयांकडून मिळालेली प्रेरणा खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.

दूध प्रकल्पातील कामकाजात सक्रिय सहभाग घेतला. पराग मिल्क फूड्‌स लि. (गोवर्धन) मध्ये कामगारापासून ते अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून दर्जेदार उत्पादन वाढीसाठी जे शक्‍य होईल त्याप्रमाणे प्रयत्न केले. देवेंद्रभाई यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन, प्रेरणा व प्रोत्साहन मिळत गेले. 

रासायनिक शेतीचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम. त्यातून उद्‌भवणारे आजार चिंता वाढविणारे आहेत. या संदर्भात आमच्या कुटुंबात सतत चर्चा होत होती. नागरिकांना पोषक अन्नधान्य, भाजीपाला, तरकारी माल व फळे आदी शेती माल मिळावा, त्यांचे जीवन सुखी, पिढी निरोगी व्हावी या उद्देशाने सेंद्रिय खत निर्मिती करण्याचा संकल्प हातात घेतला.

अनेक सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेटी दिल्या. तज्ज्ञांबरोबर चर्चा केली. बारकाईने अभ्यास केला. एकलहरे (ता. आंबेगाव) येथे कार्यरत असलेल्या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मचे शेणखत दररोज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. कच्च्या माल उपलब्ध होता. त्यामुळे ग्रो ग्रेन सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले. सेंद्रिय खत वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढली. एकरी उत्पादनात वाढ झाली.

शेतकऱ्यांशी थेट संपर्क आल्याने शेताच्या बांधापर्यंत जाता आले. त्यांचे प्रश्न समजावून घेता आले. सध्या ग्रो ग्रेन खताने महाराष्ट्र बरोबरच कर्नाटक व गुजरात राज्यातही प्रवेश केला आहे. अनेक कुटुंब उत्पादित शेती मालापासून निरोगी होणार आहेत. याचा मनस्वी आनंद वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com