व्यवसायातून उभारले समाजकार्य

अनुजा ओंकार मांजरे
शुक्रवार, 15 मार्च 2019

संगीता मांजरे यांनी त्यांच्या दुकानात ज्या मुली शिक्षण घेतात, त्या मुलींना कमवा व शिका या योजनेअंतर्गत कामावर ठेवून त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुली त्यांच्या दुकानात काम करून पैसे मिळवून शिकत आहेत. अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत.

संगीता मांजरे यांनी त्यांच्या दुकानात ज्या मुली शिक्षण घेतात, त्या मुलींना कमवा व शिका या योजनेअंतर्गत कामावर ठेवून त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुली त्यांच्या दुकानात काम करून पैसे मिळवून शिकत आहेत. अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. 

चाकण येथील संगीता मनोज मांजरे या गेली तीस वर्षे व्यवसायात ठामपणे उभ्या राहून त्यांचे पती मनोज मांजरे यांना व्यवसायात खंबीर साथ देत आहेत. व्यवसाय करताना शैक्षणिक उपक्रम, समाजकार्य करण्याकडेही त्यांचा विशेष कल आहे. खेड तालुक्‍यातील प्रसिद्ध मांजरे स्टील अँड इलेक्‍ट्रीकल्स या दुकानाची जबाबदारी संगीता या त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सांभाळतात. सुरवातीला मनोज इलेक्‍ट्रीकल्स या नावाने सुरू झालेले दुकान सध्या मॉलटाईप आहे. या दुकानात योग्य किंमत, चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळत असल्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. हे या दुकानाचे वैशिष्ट्य आहे.

संगीता या दुकानातील ग्राहकाला मालाची माहिती, त्याचा दर्जा याबाबत योग्य पद्धतीने सांगतात. दुकानात लग्न सराईत भांड्यांची झाल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. या ग्राहकाला समजावून सांगणे, त्यांचे ऐकून त्यानुसार माल देणे, योग्य किंमत आकारणे ही कला त्यांना अवगत झाली आहे. एकदा दुकानात खरेदीसाठी गेलेला ग्राहक मालाची खरेदी करूनच बाहेर पडतो हे त्यांचे व्यवसाय कौशल्य आहे. संगीता यांना त्यांच्या व्यवसायात त्यांची सून अनुजा ओंकार मांजरे या देखील मदत करतात.

अनुजा यांचे शिक्षण डीफार्मसी झाले आहे. व्यवसाय करताना ग्राहक जमविणे, ग्राहकांना समाधानी ठेवणे. योग्य किमतीत माल पुरविणे यातून व्यवसायाची भरारी घेणे ही कला सासू, सुनेला चांगलीच जमली आहे. 

अनुजा या चाकण येथील पूर्व प्राथमिक अद्वैत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या म्हणून जबाबदारी सांभाळतात. लहान मुलांना योग्य सुविधा पुरवून त्यांना योग्य शिक्षण देणे यासाठी अनुजा नेहमी धडपड करत आहेत. त्यामुळे शाळेचा दर्जा ही चांगला आहे. त्यांना मार्गदर्शन त्यांची सासू संगीता, सासरे मनोज यांचे मिळत आहे. चाकण परिसरात शुभविवाहासाठी एक प्रशस्त मंगल कार्यालय असावे यासाठी संगीता व त्यांचे पती मनोज यांनी चाकण -शिक्रापूर रस्त्यावर मुक्ता लॉन्स हे मंगल कार्यालय उभारले आहे. संगीता या मुक्ता लॉन्सच्या संचालक आहेत. शेतकऱ्यांना, कामगारांना परवडेल अशा पद्धतीने मंगल कार्यालयाचे भाड्याचे दर आकारून मोठ्या मंगल कार्यालयात मध्यमवर्गीय लोकांच्या मुला, मुलींचे विवाह होण्यासाठी संगीता यांची धडपड असते. त्यांच्या धडपडीने एकंदरीत त्यांची सूनही त्यांच्याबरोबर काम करत आहे. 

संगीता यांनी त्यांच्या दुकानात ज्या मुली शिक्षण घेतात, त्या मुलींना कमवा व शिका या योजनेअंतर्गत कामावर ठेवून त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुली त्यांच्या दुकानात काम करून पैसे मिळवून शिकत आहेत. अगदी पदवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. अनेक मुली पदवीपर्यंत शिक्षण घेऊन स्वावलंबी झाल्या आहेत. संगीता यांनी महिला मंडळ तयार करून महिलांच्या विचारांचे आदानप्रदान व सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story of Sangita Manjare on the occasion of womens day