सकारात्मकतेने स्वीकारली आव्हाने

Suchitra-Patil
Suchitra-Patil

अनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची कधीच काळजी वाटली नाही किंबहुना मला ती आवडतात म्हणूनच जाणूनबुजून, समजून-उमजून मी या क्षेत्रात आले. 

महसूल खात्यातील अधिकारी हा २४ तास कर्तव्यावर असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रात्री, अपरात्री, पहाटे कधीही काम असू शकते, पण मला कधीही ते त्रासदायक वाटले नाही. झोकून देऊन काम केल्यावर फलित चांगले मिळते, यावर माझा विश्वास आहे. गोरगरीब, सामान्य लोकांचे काम केल्याने जे समाधान मिळते, ते कशातच मिळत नाही. लौकिकार्थाने संघर्ष करावा लागला, पण मला माझ्या मूलभूत दृष्टिकोनामुळे तो कधी संघर्ष वाटला नाही. मुंबईच्या राजा शिवाजी महाविद्यालय येथे शालेय शिक्षण आणि पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला महाविद्यालयीन शिक्षण झाले. भारती विद्यापीठातून कामगारकल्याण आणि व्यवस्थापन विषय घेऊन एमएसडब्लू झाले. महाराष्ट्र सेवा परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन त्या पीएसआय-एसटीआयसाठी पात्र ठरले. लगेच तहसीलदारपदासाठी परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या आणि नायब तहसीलदार म्हणून सेवेत रुजू झाल्या. स्पर्धा परीक्षा देताना परीक्षार्थी भरपूर संघर्ष करतात, त्यामुळे दडपणाखाली आणि ताणतणावात राहतात. मात्र, सकारात्मक दृष्टिकोनामुळे मी हसतखेळत, आत्मविश्वासाने परीक्षा दिल्या व लगेच उत्तीर्ण झाले, असे त्या सांगतात. 

मी मूळची रायगड जिल्ह्यातील आणि नोकरी सुरू करताना प्रोबेशनसाठी अकोला जिल्ह्यात जावे लागले. तेथून भटकंती सुरू झाली. त्यानंतर पहिले पोस्टिंग निवासी नायब तहसीलदार म्हणून पुण्याला मिळाले. ससून रुग्णालय आणि येरवडा तुरुंगातील मृत्युपूर्व जबानी, इन्क्वेस्ट पंचनामा ही कामे करावी लागत. एकदा तर एका कैद्याने रात्री आत्महत्या केली. अशा प्रकरणात पंचनामा लगेच करावा लागतो. जेलच्या अतिशय जुनाट शेडमध्ये जाऊन पंचनामा करायचा होता. दुर्दैव म्हणजे तिथे नेमकी लाइट नव्हती.

गुडूप अंधारात त्या कामासाठी हजर असलेल्या सर्व पुरुषांमध्ये मी एकटी स्त्री होते. व्हिडिओग्राफरने वायरी जोडून कसाबसा त्याचा फ्लॅश सुरू केला आणि त्या उजेडात मी तो भयावह चेहऱ्याचा मृतदेह पाहिला आणि पंचनामा केला. असे काहीसे सुन्न करणारे अनुभव त्या काळात घेतले. त्या सततच्या निलगिरीच्या वासामुळे शेवटी मला नाकाचे त्रास सुरू झाल्यावर मी बदली मागून घेतली.

नव्यानेच सुरू झालेल्या माहिती अधिकार कार्यालयात बदली झाली. विजय कुवळेकर माहिती आयुक्त होते. त्या कार्यालयाची सुरवातच असल्याने सर्व माहिती अधिकार कायदा आणि पुढच्या प्रक्रिया मुळातून शिकून घ्याव्या लागल्या. लोकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि आम्हीही समाधानकारक उत्तरे लोकांना दिली. त्यामुळे पुढे माहिती अधिकार कायद्याची कधी भीती वाटली नाही. पुढे सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून काम करताना एक वेगळा विभाग सांभाळण्याची संधी मिळाली. तिथे प्रचंड जनसंपर्क वाढला.

रात्री-अपरात्री छापे मारण्याचा अनुभव येथे मिळाला. गरीब जनतेशी निगडित असल्याने मोठी जबाबदारी होती. त्यांच्या समस्या, स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या आणि वितरण व्यवस्थेतील समस्या सोडवण्यासाठी काम केले. कोल्हापूर येथे निवडणूक नायब तहसीलदार म्हणून काम करताना निवडणुकीचे कामकाज पाहिले. तसेच पुण्यात अधिग्रहण शाखेत काम करताना सातबारा उताऱ्यांचे अनेक प्रकार हाताळले. त्या वेळी चंद्रकांत दळवी आयुक्त होते आणि त्यांनी ‘झिरो पेंडन्सी’ अभियान सुरू केले होते. आम्ही उत्कृष्ट कामकाज करून ‘झिरो पेंडन्सी’ केली. खेडला रुजू झाल्यावर खनिजाबाबत छापे घातले. लाखोंचा दंड केला.

आजपर्यंत वेगवेगळ्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या पेलताना यशस्वी झाले, कारण ताणतणावाखाली निर्णय घेतले नाहीत. कामात तडजोड न करता नियमानुसार काम केल्यामुळे ताण येत नाही. याची पाळेमुळे घरच्या संस्कारात आहेत. पूर्वी संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी आकाशवाणीवर बातम्या लागायच्या. त्या ऐकण्यासाठी वडील बरोबर त्यावेळेला घरी यायचे. त्यामुळे बातम्यांच्या आधीचे संगीत वाजले की आम्ही जेथे असू तेथून घरी पळत सुटायचो. सातच्या आत घरात हा नियमच होता. वडिलांना शेती आवडते. शेतीसाठी त्यांनी लवकर नोकरी सोडली. त्यामुळे आमचेही मातीशी नाते तयार झाले. नोकरीत बदल्या त्रासदायक असतात. कुटुंबाला वेळ देता येत नाही. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून ही उणीव कमी करण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ कॉलिंगद्वारे मुलांशी बोलते, अभ्यासाच्या गप्पा मारते.

लहान वयातच मुलगा इंडिया लीगमध्ये फुटबॉल खेळतो. मुलगी जिम्नॅस्टिक करते. दोन्हीकडचे कुटुंबीय समजून घेतात. म्हणून अनेक गोष्टी करू शकते. बाहेरची आव्हाने पेलताना घरच्यांची साथ असल्याने त्यांचे कधी ओझे वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com