Suvarna-Dhobale
Suvarna-Dhobale

व्यवसायातून बनल्या ‘कृषिसाथी’

सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पतीला व्यवसायात मदत करू लागल्या. दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची, याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या.

‘शिकलेली आई घरादाराला पुढे नेई’ याच प्रमाणे घरात जर उच्चशिक्षित महिला असेल तर घर प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करण्यामध्ये तिचा महत्त्वाचा वाटा असतो, याचा प्रत्यय आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील पारगाव (शिंगवे) येथील सावळेराम ऊर्फ अप्पासाहेब नामदेव ढोबळे यांच्या कुटुंबात येत आहे. त्यांच्या स्नुषा सुवर्णा नानासाहेब ढोबळे या पती नानासाहेब ढोबळे यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून व्यवसाय उत्तमप्रकारे सांभाळत आजच्या युगात एकत्र कुटुंब पद्धत टिकून ठेवत कुटुंबातील सर्वांना बरोबर घेत संसाराची घडी अबाधित ठेवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

सुवर्णा नानासाहेब ढोबळे यांचे माहेर आंबेगाव तालुक्‍यातीलच चास (नारोडी) वडील वसंत माठे व आई सुशीला माठे यांच्या प्रोत्साहन तसेच उत्तम संस्कारामुळे सुवर्णा ढोबळे यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. सुवर्णा उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांचा विवाह ही २००० मध्ये पारगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विज्ञान शाखेतील बॉटनी विषयात एमएस्सी ही पदवी संपादन केलेल्या उच्चशिक्षित नानासाहेब ढोबळे यांच्या बरोबर झाला. ढोबळे परिवाराचे दोन भावांचे एकत्र कुटुंब नानासाहेब यांनी उच्चशिक्षण घेतले तर मच्छिंद्र व त्यांची पत्नी संगीता शेती व शेतीपूरक व्यवसाय करत आहे. नानासाहेब ढोबळे यांनी लग्नानंतर भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये शेतकी विभागात पाच वर्ष नोकरी केली; परंतु त्यांचे मन नोकरीमध्ये रमले नाही. 

ऋषी कृषी सेवा केंद्र
उच्चशिक्षणाच्या जोरावर शहरामध्ये मोठ्या पगाराची नोकरीही मिळाली असती, परंतु आपण राहत असलेल्या भागातील सर्वसामान्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे या उद्देशाने २००५ मध्ये पारगाव येथे ऋषी कृषी सेवा केंद्र या नावाने व्यवसायाची मुर्हुतमेढ रोवली या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीसंबधी अडचणी सोडवत मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उच्च दर्जाची नामांकित कंपन्यांची खते, औषधे, बी बियाणे विक्री सुरू केली. सुवर्णा ढोबळे याही उच्चशिक्षित असल्याने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या  पार पाडत पती नानासाहेब ढोबळे यांना व्यवसायात मदत करू लागल्या. त्यांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसायाची अर्धेअधिक जबाबदारी सांभाळू लागल्या नानासाहेब दुकानात नसले तरी दुकानात आलेल्या शेतकऱ्यांच्या पिका संदर्भातील अडचणी पिकांवरील रोग समजावून घेऊन त्यांना योग्य औषधे,  कीटक नाशके व खतांची मात्रा कशी द्यायची याचे मार्गदर्शन त्या करू लागल्या. पारगाव परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये ऋषी कृषी सेवा केंद्र आणि सुवर्णा व नानासाहेब ढोबळे कृषिसाथी वाटू लागले आहे.

या व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील १० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कुटुंबप्रमुख अप्पासाहेब ढोबळे यांचा परिसरातील सामाजिक कामात नेहमी सहभाग असतो. त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा जपत हे दांपत्य परिसरातील सामाजिक व शैक्षणिक कामातही अग्रेसर आहे. नानासाहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे, ते दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थांना शालोपयोगी साहित्य वाटप तसेच विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे देऊन खेड्यातील मुलांनीही उच्चशिक्षण घ्यावे, यासाठी प्रोत्साहन देतात सुवर्णा याही अनसूया महिला उन्नती केंद्रातर्फे आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com