इच्छाशक्तीवर उभारली शाळा

स्वाती संजय मुळे
गुरुवार, 14 मार्च 2019

सुरवातीला आव्हानात्मक वाटलेल्या शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या पाठिंब्यामुळे दमदार वाटचाल करणे शक्‍य झाले. न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधून बाहेर पडून विद्यार्थी अधिकारी किंवा उद्योजक होतील. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून होणारा आनंद माझ्या जीवनातील सर्वोच्च असेल.

सुरवातीला आव्हानात्मक वाटलेल्या शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या पाठिंब्यामुळे दमदार वाटचाल करणे शक्‍य झाले. न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधून बाहेर पडून विद्यार्थी अधिकारी किंवा उद्योजक होतील. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून होणारा आनंद माझ्या जीवनातील सर्वोच्च असेल.

माझा जन्म माटुंगा - मुंबई येथे झाला. वडील पोलिस अधिकारी असल्याने मीही धाडसी करिअर करायचे असा निर्धार केला. बालपण पुण्यात गेले.

नूमविमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाले. पिंपरी येथे डी. वाय. पाटीलमध्ये इलेक्‍ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन अभियंता, तर पुणे विद्यापीठात एमबीए व कामगार कायद्याची पदवी संपादन केली. सध्या कायदा पदवीचे शिक्षण सुरू आहे. कबड्डी खेळात प्रावीण्य मिळविले. लघुचित्रपटात व नाटकात काम केले. 

मंचर येथील संजय मारुती मुळे यांच्याबरोबर विवाह झाला. दूरदर्शनमध्ये तांत्रिक विभागात काम केले. अनेक कर्तृत्ववान व्यक्तींकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. स्वांजलीचा जन्म झाला व कुटुंबाची जबाबदारी पडल्यामुळे दूरदर्शनची नोकरी सोडली. मुलीचे संगोपन करताना इतर काही काम करता येईल का, याबाबत चौकशी केली. पुण्यातील टिळक विद्यापीठात पार्ट टाइम व्याख्याते म्हणून जॉइन झाले. त्यानंतर पूर्णवेळ हेड म्हणून एका संस्थेत काम केले. कामाचा प्रतिसाद म्हणून संस्थेने मला रजिस्टार म्हणून काम करण्याची संधी दिली. केजी ते पीजीपर्यंत सर्व प्रकारचा अनुभव घेतला. संस्थेचा विस्तार केला. २०१३ मध्ये विचार केला. एखादे इंग्रजी माध्यमाचे स्कूल सुरू करायचे. 

दरम्यानच्या काळात स्वानंदचा जन्म झाला. २०१५ फेब्रुवारीमध्ये मंचर येथे बाळासाहेब बाणखेले यांच्या जागेत स्कूलचा शुभारंभ केला. ग्रामीण भागात काम करणे सुरवातीला अवघड वाटत होते. पालकांपर्यंत पोहोचणे अवघड होते. स्कूलची माहिती अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रक काढले, फ्लेक्‍स लावले. स्कूलला चांगला प्रतिसाद मिळाला.

अनेकदा काम करताना रात्री अकरा वाजता मला पुण्याला जावे लागत असे. एकदा ड्रायव्हिंग करत होते. संध्याकाळी पेठ घाटातून जाताना मोटरसायकलस्वराने माझी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगावर सोन्याचे दागिने होते, पण मी वेगाने गाडी तिथेच जवळ असलेल्या पोलिस चौकीसमोर नेली. पोलिस माझ्याबरोबर आले. तोपर्यंत चोरटा निघून गेला होता. तेव्हापासून गाडीत दोन लोखंडी गज ठेवण्यास सुरवात केली. 

अवसरी खुर्द अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बाळासाहेब औटी यांनी एक एकर जागा स्कूलसाठी दिली. केजी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे. स्कूलच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाचवीपर्यंत विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. २०१७ मध्ये रांजणी येथे स्कूल सुरू केले आहे. दर्जेदार शिक्षण देऊन कमीत कमी शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी या भागातील एकमेव स्कूल आहे.

विद्यार्थ्यांना व्यावहारिक व आध्यात्मिक ज्ञान दिले जाते. २१ व्या शतकातील युवक बुद्धिमान व धाडसी उभा करायचा आहे. हे सर्व काम करण्यासाठी आई एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू ऑक्‍सफर्ड इंटरनॅशनल स्कूल उभारले. येथे ४५० विद्यार्थी शिक्षण घेतात. माझ्या कार्याची दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संत पीठावर तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. माझ्या यशात वडील सोपान तुकाराम वाळुंज, आई प्रेमा सोपान वाळुंज, पती संजय मुळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, बाळासाहेब औटी व पालकांची मिळालेली साथ महत्त्वाची आहे. सुरवातीला आव्हानात्मक वाटलेल्या शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या पाठिंब्यामुळे दमदार वाटचाल करणे शक्‍य झाले. न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधून बाहेर पडून विद्यार्थी अधिकारी किंवा उद्योजक होतील. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून होणारा आनंद माझ्या जीवनातील सर्वोच्च असेल.

Web Title: Inspirational story of Swati Mule on the occasion of womens day