शिक्षण विभागात अपुरे कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पिंपरी - शिक्षण विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आवश्‍यकतेपेक्षा कमी आहे. यामुळे नागरिकांना अनेकदा वेळेवर माहिती उपलब्ध होत नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामकाजावर परिणाम होत असून, प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

पिंपरी - शिक्षण विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या आवश्‍यकतेपेक्षा कमी आहे. यामुळे नागरिकांना अनेकदा वेळेवर माहिती उपलब्ध होत नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामकाजावर परिणाम होत असून, प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित शहरातील खासगी २२५ व पालिकेच्या १०५ शाळांचा कारभार आहे. या दालनात दररोज किमान १५० ते १७० नागरिक माहिती घेण्यासाठी येतात. मात्र, शाळांच्या अधिभारानुसार कर्मचाऱ्यांच्या आकडेवारीत तफावत आहे. शिवाय लिपिकांची पदेदेखील रिक्त आहेत. शिक्षकांची पगार बिले, पेन्शन, खासगी शाळांच्या समस्या, सेवाशर्ती, समग्र शिक्षण अभियान, वैद्यकीय बिल, रजांचे नियोजन, शिक्षण हक्क कायद्याची कामे, वेतनश्रेणी, सेवा ज्येष्ठता, शिष्यवृत्ती आदी कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात. शासनाची परिपत्रके त्यात होणारे बदल, त्यासाठी करावे लागणारे काम यामुळे त्यांचा ताण वाढत आहे. 

शिक्षण विभागात मुख्य लिपिकासह कनिष्ठ लिपिकांची पाच पदे मंजूर आहेत. यापैकी दोन जागा रिक्त आहेत. लेखाधिकारी अर्धवेळ असल्याने दुपारपर्यंत कासारवाडीच्या कार्यालयात असतात. मुख्य लिपिक अर्धवेळ असल्याने बहुतांश कामे अर्धवटच राहतात. उर्वरित अकरा टेबलांवरील काही लिपिक बहुतांश वेळा जागेवरच हजर नसतात. त्यामुळे माहिती मिळविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचण येते. आवश्‍यक पदे भरल्यास ही समस्या सुटू शकेल. दरम्यान, कार्यालयीन अधीक्षकांचे पददेखील वर्षभरापासून रिक्त आहे. पर्यवेक्षकांची पाच पदे मंजूर असून, त्यापैकी तीन जागांवर पर्यवेक्षकच नाहीत. यामुळे शाळांची व उपक्रमाची माहिती मिळत नाही, असे नागरिकांनी सांगितले.

कामाचा ताण पाहता कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची गरज आहे. जे कर्मचारी बाहेर असतात, त्यांना नोटीस बजावली आहे.  
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

Web Title: Insufficient employees in education department