पुण्यातील भरलेल्या धरणांची सुरक्षा 'राम भरोसे'

dau.jpg
dau.jpg

किरकटवाडी : पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरासाठी पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी व हवेली तालुक्याच्या काही भागासह  दौंड आणि इंदापूर या तालुक्यातील शेतीसाठी पाणी पुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही धरणे जवळपास शंभर टक्के भरली असून आशा भरलेल्या धरणांवर कर्मचारी संख्या अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत संदेश पोचवण्यासाठी बसविण्यात आलेली वायरलेस यंत्रणा कित्येक दिवसांपासून बंद असून त्याकडेही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या खडकवासला धरण साखळीतील 3.03 टीएमसी एकूण साठवण क्षमता असलेले व 1.97 टीएमसी उपयुक्त साठा असलेले खडकवासला धरण 100%, 10.97 टीएमसी एकूण साठवण क्षमता असलेले व 10.65 टीएमसी उपयुक्त साठा असलेले पानशेत धरण 100%,  13.25 टीएमसी एकूण साठवण क्षमता असलेले व 12.82 टीएमसी उपयुक्त साठा असलेले वरसगाव धरण 92% आणि 3.81 टीएमसी एकूण साठवण क्षमता असलेले व 3.71 टीएमसी उपयुक्त साठा असलेले टेमघर धरण 75% भरले आहे. या धरणांवर काम करणारे पाटबंधारे विभागातील अनेक कर्मचारी या वर्षी मे महिन्यात व त्या अगोदर सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यामुळे सध्या या धरणांवर कर्मचारी संख्या अत्यंत कमी आहे.

खडकवासला धरणावर एकूण कर्मचारी संख्या 14 असून यापैकी नऊ कर्मचारी हे कार्यालयीन कामकाजासाठी आहेत तर केवळ पाच कर्मचारी धरणातील पाण्याचे नियंत्रण, पाणी पातळीची नोंद ठेवणे, सुरक्षितता, माहिती पुरवणे व इतर कामासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे रात्रंदिवस सेवा बजावताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी तानातान होताना दिसत आहे. पानशेत धरणावर तर केवळ 3 व वरसगाव धरणावर 7 कर्मचारी उपलब्ध आहेत. 

उपलब्ध कर्मचाऱ्यांपैकी काही शाखा अभियंता व काही कर्मचारी कर्तव्यावर हजर नसतात. दैनंदिन हजेरीसाठी थम्ब स्कॅनिंग मशीन नसल्याने कोणता कर्मचारी कधी येतो व कधी जातो यावर पाटबंधारे विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना कर्मचारी नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखवतात.

वायरलेस यंत्रणा, काही सीसीटीव्ही कॅमेरे, धरणाच्या भिंतीवरील काही दिवे बंद आहेत. धरणाला सुरक्षारक्षक नाही. रात्रीच्या वेळी एक ते दोन कर्मचारी संपूर्ण धरण सांभाळत असतात. अचानक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एक-दोन कर्मचारी काय करणार? वायरलेस यंत्रणा बंद असल्याने तातडीने माहिती कशी पोहोचवणार? तांत्रिक माहिती नसलेले कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळणार? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे सध्या पाटबंधारे विभागाकडे नाहीत.पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांच्याशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.

"धरणावर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावेत व धरणावरील लाईट व कॅमेर्‍यांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना पत्र देण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याने खडकवासला धरणाची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे रामभरोसे असते.धरणाच्या सुरक्षेकडे पाटबंधारे विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. - सौरभ मते, सरपंच, खडकवासला.

खाजगी सुरक्षारक्षकांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे. शासकीय पातळीवर कर्मचाऱ्यांची भरती होत नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.पुढील काही महिन्यांमध्येही काही कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. धरणाच्या संदर्भात आवश्यक असलेली सुधारणात्मक कामे प्राधान्यक्रम ठरवून टप्प्याटप्प्याने पूर्ण करून घेण्यात येत आहेत. -वामन भालेराव, उपअभियंता, पाटबंधारे स्वारगेट उपविभाग.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com