इच्छुकांची भाजपलाच पसंती

ज्ञानेश सावंत
रविवार, 8 जानेवारी 2017

कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचे प्रमाण कमी; मनसेची संख्या घटली

कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या इच्छुकांचे प्रमाण कमी; मनसेची संख्या घटली
पुणे - महापालिका निवडणुकीत नशीब अजमाविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाला पसंती दिली आहे. गेल्या निवडणुकीतील इच्छुकांच्या तुलनेत या वेळी भाजपच्या इच्छुकांचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. या पक्षाकडे 1100 जणांनी उमेदवारी मागितली आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुकांची संख्या 40 टक्‍क्‍यांनी घटली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या इच्छुकांची संख्याही काही प्रमाणात कमी झाल्याचे त्या- त्या पक्षांकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडील इच्छुक वाढले असून, 600 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. राष्ट्रवादीकडून 595, कॉंग्रेसचे 587 आणि मनसेच्या 525 इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज घेतले असून, भाजपवगळता इतर प्रमुख पक्षांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यात, सर्वाधिक इच्छुकांनी भाजपकडे तिकिटाची मागणी करणारे अर्ज केल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत भाजपकडे साधारणतः 800 इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. यंदा 1100 जण इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत मनसेकडे 850 इच्छुकांनी तिकिटाची मागणी केली होती. राष्ट्रवादीकडून गेल्या निवडणुकीत 750 इच्छुकांनी अर्ज नेले होते. तर, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे 595 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. कॉंग्रेस पक्षाकडे 656 जणांनी तिकिटाची मागणी केली होती. या वेळी मात्र 587 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या शंभरने वाढल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, 'पक्षाची ध्येयधोरणे लक्षात घेता, येत्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, सर्वच घटकांतील इच्छुकांचा त्यांत समावेश आहे.''

'विरोधकांचे आव्हान असले, तरी या निवडणुकीसाठी अनेकांनी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात तिकिटाची मागणी केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत इच्छुकांची संख्या फारशी कमी झालेली नाही,'' असा दावा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा इच्छुकांची संख्या थोडी कमी झाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सूत्रांनी मान्य केले. या निवडणुकीसाठी पक्षाकडील इच्छुकांचे प्रमाण कमी झाल्याचे मनसेच्या नेत्यांनी सांगितले.

'शहरात पक्षाची ताकद वाढल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे,'' असे शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी सांगितले.

Web Title: interested candidate select to bjp party