...इच्छुक ‘युती’च्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

पुणे - महापालिका निवडणुकीकरिता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची ‘युती’ होणार की नाही, याकडे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे जेवढे लक्ष लागले आहे, तेवढेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजी-माजी नगरसेवकांचेही आहे. युती झाली तरच शिवसेना प्रवेशाचा फायदा होऊ शकतो, असा अंदाज बांधून धास्तावलेल्या काही इच्छुकांनी आपला प्रवेश रोखून ठेवला आहे. तूर्तास युतीची शाश्‍वती नसल्याने प्रवेशाची घाई करीत नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

भाजपमध्ये प्रवेश वाढल्याने या पक्षाकडील इच्छुकांची यादी दिवसागणिक वाढत आहे. परिणामी, तिकिटावरून भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्‍यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेच्या काही आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. त्याकरिता शिवसेनेच्या शहर आणि मुंबईतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन तिकीट मिळण्याची चाचपणीही ते करीत असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेचे सरचिटणीस आणि खासदार अनिल देसाई पुण्यात आले असताना काही जणांनी त्यांची भेट घेऊन प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. भाजपबरोबर युती होईल का? याचा अंदाज इच्छुकांनी घेतल्याचे समजते. युतीचे संकेत मिळताच, शिवसेनेतील प्रवेशाची घोषणा इच्छुकांकडून केली जाण्याची शक्‍यता आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा होण्याची शक्‍यता असल्याने दोन्ही काँग्रेस आणि मनसेच्या काही आजी-माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर आणखी दीड डझन नगरसेवक पक्षात येणार असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. मात्र, इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्‍यता इच्छुकांना धूसर वाटू लागल्याने ते आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यात महापालिकेतील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह, कसबा पेठेतील मनसेचा नगरसेवक, पदाधिकारी आणि काँग्रेसचा एक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मनसेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाचा भाजप प्रवेशाचा प्रयत्न फसल्याने ते शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेल्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आहेत. मात्र, अन्य पक्षांमधील इच्छुक शिवसेनेत येणार आहेत. त्याबाबत आमच्याशी चर्चा करीत असून, योग्य वेळी ते प्रवेश करतील. त्यात काही नगरसेवकांचाही समावेश आहे.
- विनायक निम्हण,  शहरप्रमुख, शिवसेना

Web Title: interested candidate waiting for the yuti