डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनीत रंगतदार लढत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पुणे - डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी प्रभागातून (क्र. 14) भाजपतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक असलेल्या ज्योत्स्ना एकबोटे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने लढतीची रंगत वाढली आहे.

पुणे - डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी प्रभागातून (क्र. 14) भाजपतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक असलेल्या ज्योत्स्ना एकबोटे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने लढतीची रंगत वाढली आहे.

या प्रभागात भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसे अशी पंचरंगी लढत होत आहे. त्यामुळे या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मूळच्या पुणेकर असलेल्या प्रा. एकबोटे यांनी प्राणिशास्त्र (झूलॉजी) विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर 1979 पासून त्या फर्ग्युसन महाविद्यालयात कार्यरत आहेत. विद्यार्थिप्रिय प्राध्यापिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. शास्त्र शाखेतील प्रत्येक विषयासाठी राज्य सरकारने मंजूर केलेले एकच पाठ्यपुस्तक असावे, त्यात रंगीत आकृत्या असतील तर संबंधित विषयाचे आकलन विद्यार्थ्यांना सुलभपणे होईल, यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ पाठपुरावा केला होता. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेत सहसचिव आणि शाळा समितीच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. गजानन एकबोटे आणि प्रा. एकबोटे मदत करीत आहेत. या पुढील काळातही सामाजिक जबाबदारी समजून तळागाळातील समाजासाठी काम करण्यासाठी राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्याचे प्रा. एकबोटे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेत पुण्याची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाली आहे. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रोचेही काम
सुरू झाले आहे. त्यामुळे आदर्श शहरातील राहणीमान सुधारावे आणि नागरी सुविधांमध्ये वाढ व्हावी, यासाठीच्या प्रयत्नात सहभागी व्हावे, या उद्देशाने महापालिका निवडणूक लढवीत आहे.
- प्रा. ज्योत्स्ना एकबोटे

Web Title: Interesting fight between Deccan Gymmkhana - Model Colony