स्वप्नांना मिळाले स्वकर्तृत्वाचे बळ (video)

स्वप्निल करळे 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून झटणाऱ्या महिलांपैकी एक उदाहरण म्हणजे शीला धारिया. जागतिक महिला उद्योजकता दिनानिमित्त त्यांची ही यशोगाथा तरुणाईला नक्कीच प्रेरणादाई ठरेल. 

पुणे  - चाकोरीबद्ध व्यवसायाच्या चौकटीतून बाहेर पडून नव्या दृष्टिकोनाने वाटचाल करून शीला धारिया यांनी मॅकेनिकल क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून झटणाऱ्या महिलांपैकी एक उदाहरण म्हणजे शीला धारिया. जागतिक महिला उद्योजकता दिनानिमित्त त्यांची ही यशोगाथा तरुणाईला नक्कीच प्रेरणादाई ठरेल. 

रसायनशास्त्रात पदवी घेऊन काही तरी नवे करायची जिद्द उराशी बाळगून त्यांनी तब्बल वीस वर्षे "स्प्रिंग मॅन्युफॅक्‍चर'चा व्यवसाय यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

त्या मूळच्या महाडच्या गांधी कुटुंबातील. त्यांच्या माहेरी कापड व्यवसाय आणि सासरी कॅसेट शॉपचा व्यवसाय. मात्र, नवे काहीतरी करायचे म्हणून त्यांच्या दिराने सुरू केलेल्या "अनंत एंटरप्रायझेस' कंपनीची 1998 मध्ये त्यांनी धुरा सांभाळली. त्यांना तसा सासरचाही मोठा पाठिंबा होता. "तुला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे ते तू कर,' असे त्यांच्या सासूबाईंनी दिलेले पाठबळ त्यांना व्यवसायात उभारी घेण्यात मोलाचे ठरले आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले. 

त्यांच्या व्यावसायिक कालखंडात 2009 मध्ये केंद्रीय संरक्षण विभागाच्या "ब्राह्मोस' मिसाईलसाठी स्प्रिंग बनविण्याची सुर्वणसंधी त्यांना मिळाली. 

"ब्राह्मोस'साठी तब्बल शंभर वेगवेगळ्या चाचण्या झाल्या. त्यात देशातून त्यांच्या "अनंत एंटरप्रायझेस' कंपनीला संधी मिळाली. हा त्यांच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा ठरला. महत्त्वाचे म्हणजे, त्या वेळी "ब्राह्मोस'च्या स्प्रिंग बनविण्याचे काम पाहणाऱ्या तिन्ही महिला अभियंत्या होत्या. त्यांनी "ब्राह्मोस'साठी 26 प्रकारच्या स्प्रिंग बनविल्या आहेत. बदलते तंत्रज्ञान आणि त्याचा योग्य उपयोग करून त्यांनी त्यांची स्प्रिंगची कंपनी अद्ययावत केली आहे. त्या "आम्ही उद्योगिनी' या संस्थेच्या माध्यमातून तरुणींना व्यवसायात येण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत. 

एक महिला उद्योजक म्हणून उद्योग आणि कुटुंब या दोन्ही पातळ्यांवर काम करणे जिकिरीचे होते. वाढती स्पर्धा, व्यवसायाचे बदलते स्वरूप, बाजारपेठेतील चढ-उतार आणि कंपनीचे व्यवस्थापन ही आव्हानेदेखील त्यांच्यासमोर उभी होती. मात्र, त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. 

त्यांच्या कार्याची दखल घेत "इंदिरा गांधी सद्‌भावना' पुस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर, पुणेतर्फे 1998 मध्ये आउटस्टॅंडिंग युनिट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 

त्यांची मुलगी रिचा एमबीए करून त्यांना व्यवसायात मदत करीत आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या मेकॅनिकल उत्पादन क्षेत्रात धारिया यांनी आपला ठसा कायम ठेवला आहे. 

महाविद्यालयात असतानाच मी व्यवसायात वेगळे काहीतरी करण्याचे स्वप्न बघितले होते. घरात व्यवसायासाठी पोषक वातावरण होते आणि त्याचाच मला या व्यवसायात फायदा झाला. बदलत्या काळाला आणि आव्हानांना समरूप होऊन मी व्यवसायामध्ये सुधारणा करीत गेले. आज वीस वर्षे ही कंपनी यशस्वीपणे सुरू आहे. 
- शीला धारिया 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International Women Entrepreneurship Day

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: