मुलाखतीचे वेळापत्रक सहा महिन्यांनंतरही नाही 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मार्च 2019

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सहायक नगर रचनाकार पदासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेतली होती. त्याचा निकाल लागून सहा महिने झाले, तरी मुलाखतीचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सहायक नगर रचनाकार पदासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेतली होती. त्याचा निकाल लागून सहा महिने झाले, तरी मुलाखतीचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

आयोगाने या परीक्षेचा निकाल १५ ऑक्‍टोबर २०१८ रोजी जाहीर केला. सुमारे १५ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापुढील टप्पा मुलाखतीचा होता. त्यासाठी ५९८ जणांना पात्र ठरविण्यात आले. इतर परीक्षांचे निकाल लागून त्यांच्या पुढील प्रक्रियादेखील पूर्ण झाल्या आहेत, परंतु सहायक नगर रचनाकार या पदासाठी आयोगाने अद्याप मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना याबाबत वारंवार आयोगाकडे विचारणा करूनही मुलाखतीची निश्‍चित तारीख जाहीर करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली आहे. यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत असल्याची त्यांची तक्रार आहे. 

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करताना त्याची विविध टप्प्यांचे वेळापत्रक त्याचवेळी जाहीर केले पाहिजे. त्यामुळे त्या तारखांना प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी आयोगाला करावी लागेल. तसे बंधनही अधिकाऱ्यांवर राहील. त्यामुळे उमेदवारांना वेळापत्रकांची वाट पाहावी लागणार नाही. योग्य वेळेत प्रक्रिया पूर्ण झाल्यास यातून आम्हाला दिलासा मिळेल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

काही परीक्षांच्या कामामुळे मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करता आलेले नाही. पुढील आठवड्यात निश्‍चितपणे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
- प्रदीपकुमार, सचिव, एमपीएससी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The interview schedule is not even after six months