कॉंग्रेस भवन पुन्हा गजबजले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - फटाके, घोषणा, हाताचा पंजा असलेल्या चिन्हाचे फडकणारे झेंडे अशा वातावरणात कॉंग्रेस भवन बुधवारी पुन्हा एकदा गजबजले. निमित्त होते, आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे. 

पुणे - फटाके, घोषणा, हाताचा पंजा असलेल्या चिन्हाचे फडकणारे झेंडे अशा वातावरणात कॉंग्रेस भवन बुधवारी पुन्हा एकदा गजबजले. निमित्त होते, आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे. 

कॉंग्रेसच्या 131व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आजपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरवात झाली. प्रभाग क्रमांक एक ते 13 मधील इच्छुक उमेदवारांचे सकाळी साडेअकरा वाजल्यापासून शक्तिप्रदर्शन करत कॉंग्रेस भवनावर आगमन होत होते. चारीचाकी, दुचाकी वाहनांच्या ताफ्यात झेंडे, घोषणा आणि फटाक्‍यांची आतषबाजी करत एक-एक उमेदवार कॉंग्रेस भवनात दाखल होत होता. कॉंग्रेसची आपापल्या प्रभागात किती ताकद आहे, याचे चित्र यानिमित्ताने कॉंग्रेस भवनात दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार कसोशीने करत असल्याचे दिसत होते. 

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, चंद्रकांत छाजेड आदी कॉंग्रेस नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 

पक्षनिष्ठा हाच निकष 
निवडून येण्याची क्षमता आणि पक्षनिष्ठा हाच उमेदवाराचा प्रमुख निकष असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""आगामी महापालिका निवडणुकीसाठी 588 इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी अर्ज घेतले होते. त्यापैकी 500 जणांनी हे अर्ज भरले आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी स्पर्धा असल्याचे यातून दिसते. अशा वेळी उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची मानली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व नेते एकत्र येऊन पक्षाच्या प्रचारासाठी सज्ज होत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे.'' 

आघाडीबद्दल बोलताना बागवे म्हणाले, ""आघाडी करू नये, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. आघाडीचा मागील अनुभव समाधानकारक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व्यासपीठावर दिसत आहेत. त्यामुळे आघाडी करू नका, असे कार्यकर्ते सांगत आहेत.'' 

प्रभाग चारमध्ये तीनच इच्छुक 
शहरातील एक ते 13 प्रभागांमधून कॉंग्रेसच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असतानाच प्रभाग क्रमांक चारमधून फक्त तीन उमेदवारांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली. त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये याबद्दल दबक्‍या आवाजात चर्चा सुरू होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interviews for the pmc elections of the Congress party