crime_logo
crime_logo

बारामती नगरपालिकेतील चोरीचा तपास वेगाने सुरु

बारामती शहर - येथील नगरपालिकेच्या चोरीमागील नेमका मास्टरमाईंड कोण याचा वेगाने तपास शहर पोलिसांनी सुरु केला आहे. दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेतील तिजोरी कटावणीच्या सहाय्याने तोडून घरपट्टी व इतर जमा असलेली 15 लाख 78 हजारांची रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली होती. नगरपालिकेच्याच रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने बारामतीत खळबळ माजली होती. 

काल रात्री आठच्या सुमारास स्कूटीवरुन आलेल्या एका युवकाने पैशांची बॅग नगरपालिकेच्या दारात ठेवली आणि तेथून त्याने पळ काढला. नगरपालिकेच्या एका कर्मचा-याने ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांना या बाबत माहिती दिली. त्यानंतर वेगाने हालचाली करुन पोलिसांनी या बॅगेजवळ असलेल्या दोघांना रात्री ताब्यात घेतले.

रात्री पंचासमोर या बँगेतील पैसे मोजले असता ही रक्कम जवळपास 13 लाखांच्या आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्रीच पोलिसांनी अनेक बाजू विचारात घेत तपास सुरु केला होता. या बाबत हाती काही ठोस माहिती आल्यावरच देऊ असे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी आज नमूद केले. 

ज्याला नगरपालिका इमारत व कामकाजाची सखोल माहिती आहे, अशा माहितगारानेच हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय असून रक्कम परत आणून ठेवणारा चोरटा हा सराईत नव्हता, तो नवखा होता असे सकृतदर्शनी वाटते असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान श्वानपथक व ठसतज्ज्ञांचीही मदत पोलिस यात घेत आहेत. 

तपास वेगाने करणार
या चोरीमधील जवळपास तेरा लाखांची रक्कम परत मिळाली असली तरी चोरीची धाडसी योजना कोणी आखली, यात नगरपालिकेतील व बाहेरचे कोणी सहभागी होते का, या चोरीचे धागेदोरे कोठपर्यंत आहेत या सर्वांचा सखोल तपास पोलिस यंत्रणा करणार आहे.
- नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.

प्रामाणिक चोरीच चर्चा अधिक...
नगरपालिकेच्या तिजोरीवर पावणेसोळा लाखांचा डल्ला मारणारा चोर नवखा असला पाहिजे किंवा पोलिसांच्या भीतीपोटी त्याने ही रक्कम परत आणून ठेवली असावी, अशीच चर्चा आज बारामतीत रंगली होती. चोरही प्रामाणिक असावा असे गंमतीने लोक बोलत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com