हवेली तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न सुटला

जनार्दन दांडगे
Monday, 14 September 2020

-हवेली तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह मृतदेहावर ग्रामपंचायत पातळीवरच अंत्यसंस्कार होणार.

-हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांचे आदेश.

 

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मृतदेहावर यापुढील काळात गावपातळीवरील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार होणार आहेत. पुणे शहरातील शवदाहीनीत ग्रामीण भागातील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याने, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीॆना वरील स्वरुपाचे लेखी आदेश दिले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गाव कामगार तलाठी, पोलिस पाटील, आरोग्य सेवक व पोलिस कर्मचारी यांची कमिटी तयार करुन, वरील कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात यावेत असे लेखी आदेश गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनास दिले आहेत.   

याबाबत अधिक माहिती देतांना प्रशांत शिर्के म्हणाले, मागील कांही दिवसांपासून हवेली तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्याचवेळी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही त्याच पटीत वाढत आहे. सध्या हवेली तालुक्यातील कोरोना बाधीत मृतदेहावर महानगरपालिकेच्या हद्दीतील शवदाहीनीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र पुणे शहरासह ग्रामिन भागातही मृत्युचे प्रमाण अचानक वाढल्याने, पुणे शहरातील शवदाहीनीवर मोठा ताण पडत आहे. यामुळे ग्रामीण भागातील मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यास विलंब होत आहे. हा विलंब टाळण्यासाठीच, पंचायत समितीने वरील निर्णय घेतला आहे. 

प्रशांत शिर्के पुढे म्हणाले, हवेली तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह मृतदेहावर ग्रामस्तरावर अंत्यसंस्कार करण्याबाबतच्या सुचना दिल्या असल्या तरी, ग्रामपंचायत हददीत अशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने व ग्रामीण भागातील लोकांमध्ये या आजाराबाबत भीती असल्याने अंत्यसंस्कार करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. यामुळे कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य सेवक व पोलीस कर्मचारी यांचेवर कोरोना पॉझिटीव्ह मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कमिटीने अंत्यविधीसाठी स्थळ निश्चिती करणे, नातेवाईक व नागरिकांमध्ये समन्वय साधणे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, गाव कामगार तलाठी यांनी वाहन व स्ट्रेचर सुविधा, झिपर शव बँग, कापड, सॅनिटायजर, पीपीई किट, जळाऊ लाकडे व इतर अंत्यविधी साहित्य खरेदी. आरोग्य सेेेवक यांनी सॅनिटाईजेशनसाठी व फवारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन करून, मृत्यु कारणाच्या निदानासाठी प्रयोगशालेय अहवाल मिळवणे तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे बीट हवालदार यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हाताळणे अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

दरम्यान, याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात म्हणाले, स्मशानभुमीमध्ये १ पेक्षा जास्त शवदाहीनी उपलब्ध असतील त्याठिकाणी १ शववाहिनी ही कोरोनाग्रस्त मृत शवासाठी राखीव ठेवावी. ज्या गावात एकच शवदाहिनी उपलब्ध असेल त्याठिकाणाबाबत अथवा अंत्यसंस्काराच्या ठिकाणाबाबत कमिटीतील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी यांनी निर्णय घ्यावा. शक्यतो शव दहन करण्यात यावे. दहन अथवा दफन लोकवस्ती पासुन १ किलोमीटर बाहेर करावे. दफन करताना किमान ६ फुट खोल खडडा घेण्यात यावा त्यामध्ये शव ठेवल्यावर १ फुट माती नंतर सोडिअम हायपोक्लोराईड १ टक्का पुन्हा  १ फुट माती व हायपोक्लोराईड १ टक्का याप्रमाणे दहन किंवा दफन कार्यवाही करावी. शव हाताळणा-या व्यक्तींनी संपुर्ण पीपीई किटचा वापर सुरूवातीपासुन शेवटपर्यंत करावा.

कोरोना बाधित रुग्णाचा घरीच मृत्यु झाल्यास, मृतव्यक्तीच्या घरातुन अंत्यसंस्कारासाठी शव नेल्यानंतर सदरची जागा सोडिअम हायपोक्लोराईडने निर्जतुकीकरण करावी. रूग्णालयातुन शव सरळ स्मशानभुमीत घेऊन जावे अंत्यदर्शनासाठी घरी ठेऊ नये. शवासाठी वापरणाच्या स्पेशल बॅगची चैन अंत्यविधीपुर्वी चेहऱ्याजवळची उघडुन जवळच्या नातेवाईकांना चेहऱ्याचे लांबुन दर्शन घेऊ दयावे .कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मृतदेहाच्या जवळ जाण्यास अथवा हात लावण्यास परवानगी देऊ नये. संपुर्ण प्रकिया पार पाडल्यानंतर शव नेणाऱ्या वहानाचे निर्जंतुकीकरण तात्काळ करावे. कोणत्याही परिस्थितीत शव नातेवाईकांच्या ताब्यात देऊ नये.

अंत्यसंस्काराचा खर्च ग्रामपंचायत करणार- 
दरम्यान कोरोना पॉझिटीव्ह मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा खर्च ग्रामपंचायतीने करावा अशा सुचना प्रशांत शिर्के यांनी केल्या आहेत. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४५ पोटकलम (३) व टिका (३) ग्रामसुची विषय क्र. ६ वैद्यकिय व आरोग्य सुचीतील अनुक्रमांक २५, ३३, ३७ मधील तरतुदीस अधीन राहुन आवश्यकतेप्रमाणे ग्रामनिधीतुन आपत्कालीन बाब कोरोना पॉझिटीव्ह मृतदेहावरील अंत्यसंस्काराचा खर्च करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The issue of cremation of corona victims in Haveli taluka has been resolved