आयटी सिटीला पीएमपीची कनेक्‍टिव्हिटी

पीतांबर लोहार
मंगळवार, 15 मे 2018

पुणे, पिंपरीतील १५ ठिकाणांहून हिंजवडी फेज तीनसाठी बससेवा सुरू
पिंपरी - आयटी सीटी हिंजवडीला पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील वडगाव मावळ व आळंदी परिसरालाही पीएमपीने कनेक्‍टिव्हिटी दिली आहे. सध्या १५ मार्गांवरून बससेवा सुरू असून ती प्रवाशांसाठी सोयीची ठरत आहे. यासाठी हिंजवडीत बस टर्मिनस उभारण्याचे काम सुरू असून, भविष्यात नवीन मार्गांवर बससेवा देण्याचेही पीएमपीचे नियोजन आहे. 

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात आयटी कंपन्या आहेत. त्या अनुषंगाने रुग्णालये, हॉटेल, मॉल, विविध सेवा व्यवसाय व उद्योग वाढले आहेत. गेल्या २० वर्षांत या भागांचा झपाट्याने विकास व विस्तार झाला आहे. रोजगाराच्या निमित्ताने अनेकांचे येणे-जाणे सुरू असते. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतून बससेवा सुरू केली आहे. तसेच, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र आळंदी देवाची (ता. खेड) आणि मावळ तालुक्‍याचे ठिकाण वडगाव ही गावेसुद्धा जोडली आहेत. हिंजवडीलगतच्या बालेवाडी, चिंचवड व डांगे चौक परिसरांतून शटल सेवा सुरू केली आहे. त्याचा चांगला फायदा प्रवाशांना होत असून या ठिकाणांहून वेगवेगळ्या भागात जाणे सोयीचे ठरत आहे.

हिंजवडीगाव आणि हिंजवडी आयटी पार्क फेज ३ (माण) अशा दोन भागांसाठी बससेवा सुरू आहे. तसेच हिंजवडी, वाकड, ताथवडे परिसरात नामांकित संस्थांची शैक्षणिक संकुलेही आहेत. तेथील विद्यार्थ्यांनाही बससेवेचा उपयोग होत आहे. 

फेज तीनसाठी बससेवा
हिंजवडी फेज तीनसाठी बससेवा सुरू असलेली ठिकाणे : कात्रज, हडपसर, भक्तिशक्ती- निगडी, डांगे चौक- थेरगाव, चिंचवडगाव, जुनी सांगवी, आळंदी देवाची, मुकाई चौक- रावेत, वडगाव मावळ, स्वारगेट, नेहरूनगर डेपो, पुणे महापालिका भवन, लोहगाव विमानतळ, बालेवाडी.

कंपनीच्या कामानिमित्त हिंजवडीत नेहमीच जावे लागते. पूर्वी चिंचवडला येऊन बस बदलावी लागायची. आता भोसरीतून थेट बस आहे. त्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे बसची वाट पाहत थांबावे लागत नाही.
- ईश्‍वर औटी, प्रवासी

हिंजवडीसाठी वेळापत्रकानुसार बस सुरू आहेत. आणखी बस संख्या व फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. टप्पा दोनमध्ये एमआयडीसीने सव्वा एकर जागा दिलेली आहे. तिथे बस टर्मिनस विकसित करण्याचे काम सुरू आहे. 
- दत्तात्रेय माने, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Web Title: IT City PMP Bus Connectivity