आयटीयन्सनी शोधला नवा व्यवसाय

सुधीर साबळे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पिंपरी - आयटी कंपन्यांमध्ये त्यांची नोकरी सुरू होती. कारण न देता त्यांचे काम थांबविले. या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी त्यांनी कामगार आयुक्‍तालय गाठले. तिथे सुनावण्या झाल्या; पण ठोस मार्ग निघाला नाही. नोकरीची लढाई जिंकण्यासाठी झगडत असताना नित्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी व्यवसाय सुरू केला. या मंडळींना व्यवसायात अडचणी येतात. मात्र, नक्‍कीच यशस्वी होऊ, असा विश्‍वास त्यांच्यात आहे. अनेकांनी त्यांच्या व्यथा ‘सकाळ’कडे व्यक्‍त केल्या. 

पिंपरी - आयटी कंपन्यांमध्ये त्यांची नोकरी सुरू होती. कारण न देता त्यांचे काम थांबविले. या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी त्यांनी कामगार आयुक्‍तालय गाठले. तिथे सुनावण्या झाल्या; पण ठोस मार्ग निघाला नाही. नोकरीची लढाई जिंकण्यासाठी झगडत असताना नित्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी व्यवसाय सुरू केला. या मंडळींना व्यवसायात अडचणी येतात. मात्र, नक्‍कीच यशस्वी होऊ, असा विश्‍वास त्यांच्यात आहे. अनेकांनी त्यांच्या व्यथा ‘सकाळ’कडे व्यक्‍त केल्या. 

कॅब सर्व्हिस
एस. हरी (नाव बदलले आहे) - आठ वर्षांपासून आयटी कंपनीत चांगल्या पदावर काम करत होते. मात्र, नोकरीवर संक्रांत आली. नवी नोकरी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यश आले नाही. त्यामुळे त्यांनी कॅब सर्व्हिसचा व्यवसाय सुरू केला. त्यातून महिन्याला १५ हजार रुपये मिळतात. नोकरीत असताना दरमहा साठ हजार मिळायचे. मात्र, कॅबच्या व्यवसायात त्यांना तितके पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हप्ते आणि अन्य खर्च भागविताना कसरत करावी लागत आहे. व्यवसायात मिळणारे यश चांगले असेल, असा त्यांना विश्‍वास आहे. 

भाज्यांचे डायरेक्‍ट मार्केटिंग
अमित. एम (नाव बदलले आहे) - आयटी कंपनीत चांगल्या पदाची नोकरी करीत होता. महिन्याला ६५ हजार रुपये पगार; पण नोकरी गेली. कामगार न्यायालयात दावा केला आहे. निकाल कधी लागेल याची माहिती नाही. तोपर्यंत काय करणार म्हणून अमित यांनी भाज्या कापून त्याचा पुरवठा करणे आणि डायरेक्‍ट मार्केटिंगचे काम करण्याचा मार्ग निवडला. या दोन्ही कामांमधून त्यांना महिन्याला दहा ते बारा हजार मिळतात. नोकरीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

केक शॉपीचा व्यवसाय 
अजितकुमार टी. (नाव बदलले आहे) - आयटी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होते. मात्र, त्यांना नोकरी सोडा, असे कंपनीकडून सांगण्यात आले. दरमहा ८० हजार रुपये पगाराची नोकरी गेल्यामुळे संसाराचा गाडा चालविण्यासाठी काय करायचे, असा प्रश्‍न त्यांना भेडसावत होता. मात्र, कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता नोकरीबाबत दाद मागण्यासाठी त्यांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केला. भाड्याची जागा घेऊन तेथे केक शॉपीचा व्यवसाय सुरू केला. त्यातून दर महिन्याला १५ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे. मात्र, भविष्यात व्यवसाय वाढेल, अशी खात्री त्यांना आहे. 

व्हिसाची कन्सल्टन्सी 
सी. सचिन (नाव बदलले आहे) - एका सल्लागार कंपनीत चांगल्या हुद्यावर काम करताना त्यांना काम थांबविण्याचे आदेश कंपनीकडून देण्यात आले. महिन्याचा एक लाखाचा पगार बंद झाला. त्यामुळे घराच्या कर्जाचा हप्ता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्‍न त्यांना पडला. गेलेली नोकरी पुन्हा मिळविण्यासाठी त्यांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केला. सात महिन्यांपूर्वी त्यांनी व्हिसा आणि इमिग्रेशनची कन्सल्टन्सी सुरू केली असून, दरमहा त्यामधून २५ ते २८ हजार रुपये मिळत आहेत. सचिनही व्यवसायात प्रथमच उतरले आहेत.

Web Title: IT Company Employee New Business