तुझ्या कुशीत कसली मला मरणाची भीती...

पीतांबर लोहार
गुरुवार, 10 जानेवारी 2019

आयटीयन्स दांपत्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप माहिती असते. त्यानुसार तडजोड करून वागायला हवे. दोघांनी एकमेकाला समजून घेतल्यास संसार सुखाचाच होईल. 
- ललित जाधव, आयटी अभियंता

पिंपरी - ते दोघेही आयटी अभियंता..., हिंजवडीतील एकाच कंपनीत..., कामाच्या वेळा वेगवेगळ्या..., भेट दुरापास्त..., अधूनमधून कामानिमित्त परदेश दौरे..., त्यामुळे वाढणारा दुरावा अन्‌ विरह..., संसारवेलीवर उमललेलं फूल..., घरी आल्यावर त्याचं लुडबुडणं..., रात्री-अपरात्री परेदशातील ‘कॉल’ स्वीकारून काम करणं... सकाळी लवकर उठून पुन्हा कंपनी गाठणं... अशा जीवनाच्या हिंदोळ्यांवर हेलकावे खाणाऱ्या आयटीयन्स दांपत्याचं भावविश्‍व कविता अन्‌ कथांमधून मांडून आयटी अभियंता तरुणी जीवनाचा आनंद घेत आहे. तिला साथ मिळतेय अभियंता पती ललित आणि सासूबाई उज्ज्वला यांच्या मायेची. ही कथा आहे रावेतमधील रॉयल कासा सोसायटीतील मोनिका जाधव-धुमाळ यांची. 

एकमेकांच्या भेटीबाबतची भावना व्यक्त करताना मोनिका म्हणतात, ‘भेटीतलं अधुरंपण सतत जाणवत राहील अन्‌ कविता माझ्या अशाच राहतील अधुऱ्या. पण, नक्कीच अर्थपूर्ण... अगदी तुझ्या माझ्या एअरपोर्टवरच्या अधुऱ्या; पण अर्थपूर्ण भेटीसारख्या...’ पतीवरचा विश्‍वास व्यक्त करताना त्या म्हणतात, ‘सांग ना कुठे विसावू मी अशा कातर रात्री, तुझ्याच कुशीत रे कसली मला मरणाची भीती...’ आयटीयन्सची आवड म्हणजे वीकेंडचा एंजॉय. परंतु, घरात एकमेकांच्या सहवासात राहूनच जाधव कुटुंब वीकेंड साजरा करतात. 

मोनिका यांच्या तीन वर्षांच्या मुलाचे नाव अद्वैत. त्यालाही आता मम्मी-पप्पांच्या कामाची सवय झाली आहे. मम्मी-पप्पा ड्यूटीवर गेल्याचे सांगितले की तो, ‘हो का? ठीक आहे’ असे म्हणून खेळायला लागतो, असे त्याची आजी उज्ज्वला जाधव यांनी सांगितले. मोनिका म्हणाल्या, ‘‘मी गरोदर असल्याचे कळाले, त्याच दिवशी ललित यांना एक वर्षासाठी इंग्लंडला जाण्याची ऑर्डर आली. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे विरह होता; पण दोघांनीही एकमेकांच्या भावना समजून घेतल्या. गरोदरपणा व बाळंतपणानंतरच्या सर्व तपासण्या स्वतः करून घेतल्या. सोबत होत्या फक्त सासूबाई.’’ 

अद्वैतची गुड न्यूज आणि ललित यांची इंग्लंडवारी याबाबतच्या भावना कवितेतून व्यक्त करताना मोनिका म्हणतात, 

‘कसा निघून गेलास तू 
त्या दिवशी 
जणू काही बंद मुठीतली वाळू 
पटकन निसटून गेली...
एकदम अलगद...
पण बघ ना ही वेळ...
इथेच थांबून राहिलीय
सूर्य आकाशात असूनही
नभ भरून आलंय...
... माझ्याच मनाचं 
आभाळ भरून आलेलं
बरसण्यासाठी आतूर झालेलं...

आयटीयन्स दांपत्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप माहिती असते. त्यानुसार तडजोड करून वागायला हवे. दोघांनी एकमेकाला समजून घेतल्यास संसार सुखाचाच होईल. 
- ललित जाधव, आयटी अभियंता

Web Title: IT engineer couple story