पुण्यात आयटीयन्सचा वेळ वाचणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

वाकडमधील कस्पटे चौकातून थेट बाणेरमध्ये जाण्यासाठी मुळा नदीवर बांधण्यात आलेला पूल आगामी आठ महिन्यांत वाहतुकीला खुला होणार असल्याने वाहनचालकांचा त्रास कमी  होणार आहे. 

पुणे - तुम्ही जर हिंजवडी, रावेत, वाकडमधून निघालात आणि औंधमार्गे पुण्याच्या दिशेने जात असाल; तर तुम्हाला बऱ्याचदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असेल. वाकडमधील कस्पटे चौकातून थेट बाणेरमध्ये जाण्यासाठी मुळा नदीवर बांधण्यात आलेला पूल आगामी आठ महिन्यांत वाहतुकीला खुला होणार असल्याने वाहनचालकांचा त्रास कमी  होणार आहे. 

बाणेर ते वाकडमधील कस्पटे चौक यांना जोडणाऱ्या पुलाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, कस्पटे चौकातील जागा ताब्यात येत नसल्याने अनेक दिवसांपासून या पुलाचे काम रखडले होते. काही दिवसांपूर्वी ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली असून, पुलाचा स्पॅम उभारण्याचे काम सुरू  केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुळा नदीवरून येणारा हा पूल थेट या चौकात येत असल्याने पुण्याकडे ये-जा करण्यासाठी नागरिकांना बाणेरचा रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्या औंध रोडवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

हिंजवडी आयटी पार्कमधून पुण्यात जाणाऱ्या आयटीयन्सना औंधमार्गे जावे लागत आहे. सायंकाळी सहा ते नऊ यावेळेत ब्रेमेन चौक, औंध परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळे अनेकांना या गर्दीत अडकून पडावे लागते. मुळा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आयटीयन्सना बाणेर रस्ताचा वापर करून थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये जाता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील रावेत, वाकडकडून येणाऱ्या वाहनचालकांना हा पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. 

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?

चौकाचे रुंदीकरण होणार
मुळा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाकड भागातील या चौकाचे रुंदीकरण करावे लागणार आहे. सध्या या चौकामध्ये तीन रस्ते मिळतात. पुलावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर तेथील वाहतूक  वाढणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IT Hinjewadi wakad kaspate chowk traffic issue slove

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: