विद्यार्थ्यांसमोरील अडचणी संपेनात; प्रश्‍नसंच मिळण्यास अजून आठवडा उजाडणार

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 13 September 2020

कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने 'एमसीक्‍यू' परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी बहुपर्यायी प्रश्‍नांचा (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन - एमसीक्‍यू) संच द्यावा, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहेत. मात्र, परीक्षेसाठी एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असला तरी प्रश्‍नसंच मिळण्यास एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने 'एमसीक्‍यू' परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'एमसीक्‍यू'मध्ये उत्तर चुकले की, थेट शून्य गुण मिळतात, त्याचा परिणाम निकालावर होणार असल्याने सरावासाठी प्रश्‍नसंच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

पुणे विद्यापीठाने प्रश्‍नसंच तयार करण्यासाठी विद्याशाखा व अभ्यासमंडळांच्या माध्यमातून तज्ज्ञ प्राध्यापकांना हे काम दिले आहे. एका विषयाचे सुमारे 300 प्रश्‍न काढले जाणार आहेत. त्यापैकी 50 गुणांच्या परीक्षेमध्ये 50 प्रश्‍न सोडविणे अनिवार्य असतील, पण विद्यार्थ्यांना सुमारे 60 प्रश्‍न परीक्षेसाठी दिले जातील, असे सूत्रांनी सांगितले.

दांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय​

सुकाणू समितीत निर्णय अपेक्षित
परीक्षेचे नियोजन, प्रश्‍नसंच तयार करणे, वेळापत्रक याच्या कामासाठी विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती नियुक्त केली. त्यात चार विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि तीन ते चार प्राचार्य आहेत. ही समिती विद्यार्थ्यांना प्रश्‍नसंच द्यायचा की नाही, द्यायचा असेल तर तो कधी उपलब्ध होईल याबाबत निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी कुलगुरूंनी परीक्षेपूर्वी 2 ते 3 सराव परीक्षा होतील, असे सांगितल्याचे ट्विट तनपुरे यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It will take another week for final year students to get questionerys from Pune University