‘आयटीएमएस’बाबत अखेर जाग!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस येत आहेत. आयटीएमएस आवश्‍यक आहे; परंतु त्यात सुधारणा करण्याचा आग्रह ‘एनईसी’ कंपनीकडे केला जाईल. आयटीएमएस सक्षमपणेच सुरू राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जातील.
- नयना गुंडे, अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

पुणे - पीएमपीच्या ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ची (आयटीएमएस) रुळावरून घसरलेली गाडी मार्गावर आणण्यासाठी महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने अखेर पावले उचलली आहेत. आयटीएमएसमधील विसंगतीचा अहवाल तीन दिवसांत मिळणार असून, त्यानंतर याबाबत बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका आणि पीएमपीने बुधवारी स्पष्ट केले. 

पीएमपीच्या ‘आयटीएमएस’मध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. त्याची दखल घेऊन महापालिका आणि पीएमपीने याबाबत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. याविषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘आयटीएमएसमधील विसंगतीबाबत पीएमपीच्या पाच ठेकेदारांनी यापूर्वीच आक्षेप घेतले आहेत. त्यानुसार प्रशासनाने एक ‘थर्ड पार्टी कन्सलटन्ट’ नियुक्त केला आहे. त्यांच्यामार्फत दहा बसची पाहणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल चार दिवसांत मिळणार आहे. त्यानंतर बैठक घेऊन त्यात आयटीएमएसचा दर्जा सुधारण्यासाठी आराखडा निश्‍चित करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल.’’ 

पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘‘आयटीएमएसमधील विसंगतीबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनीही तीन दिवसांत याबाबत बैठक घेण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.’’ दरम्यान, ‘आयटीएमएस’मधील विसंगतीबाबत ‘एनईसी’ कंपनीची बाजू समजून घेण्यासाठी ‘सकाळ’ने त्यांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITMS PMP