'नॅक' मानांकनामुळे जुन्नरचे जयहिंद कॉलेज राज्यात प्रथम

दत्ता म्हसकर
रविवार, 8 जुलै 2018

जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) कडून “B ++” श्रेणी देण्यात आलेली आहे.

जुन्नर - कुरण ता. जुन्नर येथील जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला “B ++” नॅक मानांकन मिळाले आहे. नवीन मुल्यांकन पद्धतीनुसार मिळालेल्या मानांकनामुळे जयहिंद राज्यात प्रथम व देशात पाचवे महाविद्यालय ठरले आहे.

जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) कडून “B ++” श्रेणी देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) समितीकडून ६  व ७ एप्रिल रोजी जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची तपासणी करण्यात आली होती. 

राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) ही भारतातील महाविद्यालयांचे मुल्यांकन करून व शैक्षणिक कामकाजाच्या दर्जाचे निरीक्षण करून गुणवत्तेचे प्रमाण ठरविणारी संस्था आहे. संबंधित परिषदेने जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची तपासणी करून उपलब्ध शैक्षणिक, पायाभुत सुविधा, विद्यार्थी, पालकांचे अभिप्राय व इतर बाबींची सखोल परिक्षण केले आणि त्यानुसार संस्थेस मानांकन देण्यात आले. 

जून २०१७ पासून नॅकने मुल्यांकन प्रक्रियेमध्ये आमुलाग्र बदल करून पहिल्यांदाच ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविली होती. ज्यामध्ये सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांचे अभिप्राय, शिक्षक, पुरवठादार, कंपन्या यांचे अभिप्राय नोंदवून पारदर्शकता आणली. सन २००० नंतर स्थापन झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील व प्रथमच ऑनलाईन पध्दतीने पार पडलेल्या या प्रकियेत २.७९ CGPA गुण घेऊन  “B ++” श्रेणी मिळवणारे जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय, कुरण (पुणे) हे महाराष्ट्रातील पहिले व भारतातील पाचव्या क्रमांकाचे अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ म्हणाले, जयहिंद शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक दर्जा सांभाळण्यासाठी सर्वच स्तरावर आम्ही प्रयत्नशील व बांधील आहोत आणि नॅक मानांकन प्राप्त झाल्याने  हा उत्साह द्विगुणीत झाला असून संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचा प्रयत्न करते. यापुढील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी समजुन घेऊन त्यावर अभ्यास करून जास्तीत जास्त शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे नावाजलेले महाविद्यालय असून यापुर्वीच आय. एस. ओ. १४००१:२००४ व आय.एस.ओ.९००१:२०१५ मानांकन प्राप्त महाविद्यालय आहे. नॅक मानांकन प्राप्त झाल्याने जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Jai Hind College of Engineering has been given the category B plus plus by the NAAC