तिने डोळसपणे पाहिलं अन्‌ साकारलं एक दिव्यस्वप्न

तिने डोळसपणे पाहिलं अन्‌ साकारलं एक दिव्यस्वप्न

महिला दिन 2019 
पुणे - डोळस माणसाची दृष्टी थिटी पडेल, असं दिव्यस्वप्न एका अंध महिलेनं पाहिलं. त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. डोळस जगानंच उभे केलेले अडसर वाटेत आले; पण त्यांना धक्के देत, ते पार करीत ती चालत राहिली... अंध आणि अपंगांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, असं तिचं स्वप्न होतं; ते आता साकारू पाहत आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून देशातील पहिलं अंध-अपंगांसाठी वरिष्ठ महाविद्यालय ती सुरू करीत आहे.

जाई खामकर हे त्या कर्तबगार महिलेचं नाव. शिरूर तालुक्‍यातील टाकळी हाजीमध्ये हे महाविद्यालय सुरू होतंय. त्यांचा संघर्ष थक्क करणारा आहे. पण, दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि आशावाद असेल, तर परिस्थितीच तुमच्यासमोर हात जोडून उभी राहते, याचाही प्रत्यय येतो. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत सारं काही ठीक सुरू होतं. पण, कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना क्षणात सारं बदलून गेलं.

औषधाची रिॲक्‍शन आल्याचं निमित्त झालं. त्यांचं शरीर लुळं पडलं, दृष्टी गेली. अंधपणाचं दु:ख बरोबर घेऊन त्या उभ्या राहिल्या, घराबाहेर पडल्या. सुरवातीला त्यांनी एसटीडी बूथचा व्यवसाय सुरू केला. त्यातून अंध-अपंगांशी संपर्क येऊ लागला. आता सर्वांसाठी काहीतरी केलं पाहिजे, असा निश्‍चय त्यांनी केला. मळगंगा अपंग संस्था सुरू करून परिसरातील अडीचशे अंध-अपंगांना एकत्र आणलं. 

औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची मदत घेऊन, त्यांना काम मिळवून दिलं खरं; पण त्यांना उच्च शिक्षण मिळत नाही, याची खंत मनात होती. म्हणून त्यांनी पुण्यात ५२ अंध-अपंग मुलींना विविध महाविद्यालयांत प्रवेश मिळवून दिला. पण, प्रत्येक ठिकाणी वसतिगृह मिळणार नाही, असं सांगण्यात आलं. या नकारामुळे त्यांनी वसतिगृहासह महाविद्यालय  सुरू करण्याचा दृढनिश्‍चय केला. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडं प्रस्ताव दाखल केला. पण, उच्च शिक्षणासाठी ब्रेल लिपीमध्ये अभ्यासक्रम नाही म्हणून तो फेटाळण्यात आला.

दृष्टिदान दिनी सुरवात
महाविद्यालय उभं करायचंच, हा निश्‍चय होताच; त्यामुळं जाई यांनी सरकारदरबारी फेऱ्या मारण्यास सुरवात केली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंधांना शिकवणं सोपं झाल्याचं त्यांनी सरकारच्या गळी उतरवलं आणि २०१७ मध्ये त्यांच्या महाविद्यालयाला मान्यता मिळाली. गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं त्यांना संलग्नता बहाल केली आहे. महाविद्यालयाचं बांधकाम तीन गुंठे जागेत सुरू करण्यात आलं आहे. दहा जून रोजी जागतिक दृष्टिदान दिन आहे; या दिवशी हे महाविद्यालय सुरू करणार असल्याचं तसेच भाऊ बाळशीराम चोरे आणि तुकाराम रासकर यांची मदत मोलाची ठरल्याचं त्या सांगतात.

अंधांसाठी धोरण देणार 
जाई खामकर म्हणाल्या, ‘‘महाविद्यालयासाठी केंद्र सरकारकडेही अनुदानाची मागणी केली होती. त्यांच्याकडून पत्रव्यवहार झाला आहे. देशातील हे पहिलेच अंध-अपंगांचे महाविद्यालय असल्याने त्यासाठी आधी कोणतेच सरकारी धोरण तयार नाही. तसे धोरण तयार करण्याची सूचनाही केंद्र सरकारने केली आहे आणि त्यानुसार मदत करण्याची तयारी सरकारने दाखविली आहे. आमच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. देशासाठी शैक्षणिक धोरण तयार करण्याचे कामही करणार आहे.’’

संगणकावर शिक्षण
अंधांसाठी उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम नव्हता. तो जाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑडिओ स्वरूपात तयार केला आहे. कला आणि वाणिज्य या शाखांचे शिक्षण महाविद्यालयात संगणकाद्वारे दिले जाणार आहे. अंध विद्यार्थ्यांना ऐकून आणि अपंगांना स्क्रीनवर दाखवून शिकविले जाणार आहे. महाविद्यालयात ८० टक्के विद्यार्थी हे अंध आणि अपंग असतील, तर २० टक्के विद्यार्थी सर्वसाधारण असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com