काढलेली जलपर्णी पुन्हा नदीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

महापालिकेने ऐन पावसाळ्यात नदीतील जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घेतली असून, ती काढून पात्रातच कडेला टाकली जात आहे. त्यामुळे काढलेली जलपर्णी पुन्हा नदीत वाहून येत असल्याचे गुरुवारी दिसून आले.

पुणे - महापालिकेने ऐन पावसाळ्यात नदीतील जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घेतली असून, ती काढून पात्रातच कडेला टाकली जात आहे. त्यामुळे काढलेली जलपर्णी पुन्हा नदीत वाहून येत असल्याचे गुरुवारी दिसून आले.

 गेल्या चार दिवसांपासून जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून, ते व्यवस्थित सुरू आहे का, याकडे महापालिकेचा एकही विभाग लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामगार व जेसीबीवर होणारा खर्च वाया जात आहे. 

तलावांतील जलपर्णी काढण्याच्या बनावट निविदा प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत नदीपात्रात प्रचंड जलपर्णी वाढल्याच्या तक्रारी आल्या. त्या-त्या भागांतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात असल्याचे आरोग्य खात्याच्या निदर्शनास आले. तरीही, ती काढण्यासाठी वाहन आणि आरोग्य खात्याने पावले उचलली नाहीत. त्यामुळे नदीतील जलपर्णी वाढली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती काढण्याचे काम हाती घेतले. नदीतील जलपर्णी पूर्णपणे बाहेर काढून ती इतरत्र वाहून नेणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ नावापुरतीच जलपर्णी काढण्यात येत असल्याचे दिसत आहे.

नदीपात्रातील संपूर्ण जलपर्णी काढण्यात येत आहे. या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. मात्र, जलपर्णी काढून त्याच ठिकाणी टाकण्यात येत असेल, तर ती उचलण्यात येईल.
- नितीन उदास, प्रमुख, वाहन खाते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalaparni again in the river