खेडमध्ये जलयुक्त शिवारला अपयश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

राजगुरुनगर - खेड तालुक्‍यात जलयुक्त शिवार योजनेला फारसे यश मिळाले नाही, म्हणून अजूनही टॅंकरची मागणी होत आहे, अशी खंत आमदार सुरेश गोरे यांनी खरीप हंगाम आढावा व पाणीटंचाई नियोजन बैठकीमध्ये व्यक्त केली.

भेसळयुक्त व बोगस भातबियाणे पुरवूनही महाबीजवर कारवाई होत नसल्याची टीका भाजपचे जिल्हा परिषद गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी या बैठकीत केली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती अमोल पवार, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

गोरे म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवार योजनेसाठी टंचाईग्रस्त गावे निवडली होती. मात्र, अंशतः पाणीटंचाई कमी झाली. भामा आसखेड व चासकमान धरणाच्या पाण्याखालील  सिंचनक्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे पाणी नियोजन कोलमडत चालले असून कालव्याचे आवर्तन ४५ दिवसांवरून ७५ दिवसांवर गेले आहे. यापुढे सूक्ष्मसिंचनाचा विचार करावा लागेल.

खरिपासाठीचे कर्जवाटप गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत चालले होते, ते पेरणीआधी झाले तर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.’’

कृषी सभापती सुजाता पवार यांचेही भाषण झाले. तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी खरीप आढावा सादर केला, तर गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी अन्य बाबींचा आढावा दिला. प्रास्ताविक मनोज कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन जीवन कोकणे यांनी केले. उपसभापती अमोल पवार यांनी आभार मानले.

गेल्या वर्षीचा टॅंकर अजून नाही
खेड तालुक्‍याला गेल्या वर्षी दिलेला टॅंकर यावर्षीचा पावसाळा आला तरी इथपर्यंत आला नाही, असे सांगून अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवू नये अशी जाहीर समज दिली. टॅंकर ठेकेदार बारामतीचा असला तरी आम्ही त्याला काय पाणी टाकू नको असे सांगतो काय?, असा सवाल त्यांनी केला. बोगस बी-बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी अशी सूचनाही त्यांनी दिली.

Web Title: Jalyukta Shivar Unsuccess in Khed