आंबेगाव खुर्द तलाव पर्यटकांचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सध्या तलाव पूर्ण भरला आहे. मात्र, त्याचे पाणी येणाऱ्या सांडपाण्याने प्रदूषित झाल्यामुळे एक थेंबही वापरण्यायोग्य राहिलेला नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- प्रसाद जगताप, आंबेगाव खुर्द

पुणे - सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराच्या दक्षिणेकडील नागरिकांसाठी आकर्षणबिंदू ठरलेला आंबेगाव खुर्द-जांभूळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. त्यामुळे पाण्यामध्ये खेळण्यासाठी पर्यटकांची पावले तलावाच्या दिशेने वळू लागली आहेत. 

आकाराने लहान असणारा हा तलाव पूर्ण भरल्याने सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. कोळेवाडी, जांभुळवाडीतील डोंगर भागातून वाहणारे झरे, ओढे, नाले हे तलावाचे पाणी भरण्याचे प्रमुख नैसर्गिक स्रोत आहेत. तलावातील अतिरिक्त पाणी नैसर्गिकरीत्या पूर्वेकडील पुलाखालून वेगाने ओढ्यात जात असल्याने आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक परिसरांतून जाणारा ओढा तुडुंब भरून वाहू लागला आहे. परिसरातील पाण्याची गरज भागविण्यासाठी १९७२ च्या दुष्काळात सुमारे ९२ एकरांवर तयार केलेल्या तलावाचे काम १९८३ मध्ये पूर्ण झाले.

पावसाच्या पाण्याबरोबर उतारावरून वाहून येणारी माती, गाळ यामुळे त्याच्या साठवणूक क्षमतेवर परिणाम झाला आहे. तलावास सध्या प्रदूषणाने घेरले असून, यावर पालिकेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. तलावाच्या सीमाभिंतीवर झाडे उगवली आहेत, तसेच नवीन सुशोभीकरणासाठी तलावातून पूर्वी पाणी सोडले होते. सध्या त्या ठिकाणी गळती सुरू आहे. त्यामुळे तलावाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jambhulwadi Lake Water Tourism Place