coronavirus:पिंपरीमधील उपनगरांतही शांतता

moshi
moshi

पिंपरी-चिंचवडच्या उपनगरांमध्ये ‘जनता कर्फ्यू’ला पूर्ण प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्याने जुनी सांगवी, नवी सांगवी, भोसरी, मोशी आणि चिखलीतील चौक व रस्ते निर्मनुष्य होते. 

नवी सांगवी परिसर 
नवी सांगवी - सांगवी, पिंपळे गुरव व पिंपळे सौदागरमध्ये पूर्णपणे प्रतिसाद मिळाला. पिंपळे सौदागर येथील बीआरटी रस्ता, गोविंद यशदा चौक, कोकणे चौक, शिवार चौक, कुणाल आयकॉन रस्त्यावर शुकशुकाट होता. शिवार चौकात वाहतूक पोलिस व वॉर्डन पाहायला मिळाले. सोसायट्यांच्या गेटवर सुरक्षारक्षकांशिवाय कोणीही दिसत नव्हते. पिंपळे गुरव येथे पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून रस्ते साफसफाईचे काम सुरू होते; तर पुरुष औषधफवारणी करीत होते. सांगवी-ढोरेनगर येथील जयभवानी मित्र मंडळातर्फे पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना चहा व नाश्‍ता देण्यात आला. 

जुनी सांगवी परिसर
माहेश्‍वरी चौक, वसंतदादा पाटील पुतळा बसस्थानक, एकता चौक, एकता चौक ते शितोळेनगर या प्रमुख बाजारपेठ असलेले रस्ते व चौक निर्मनुष्य होते. क्वचित एखादं दुसऱ्या बाहेर पडणाऱ्या नागरिकास पोलिसांनी समज देऊन घरी राहण्याचा सल्ला दिला. 

भोसरी परिसर
भोसरी-आळंदी रस्ता चौक, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, चांदणी चौक, पीएमटी चौक, पीसीएमटी चौक, लांडेवाडी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा दोन्ही बाजूकडील सेवारस्ता; तसेच इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट, श्री तिरुपती बालाजी चौक, साई चौक, इंद्रायणी चौक आदी ठिकाणी शुकशुकाट होता. सर्वच दुकाने बंद असल्याने सकाळी सात वाजेपर्यंत काही नागरिकांनी दुधासाठी दुकानांची शोधाशोध केली. बीआरटीएस टर्मिनल आणि पीएमपीच्या बस स्थानकावरून सकाळी काही बस सोडण्यात येत होत्या. मात्र, दुपारी दोननंतर पीएमपी बससेवा बंद करण्यात आली.

मोशी परिसर
येथील मंडईत प्रत्येक रविवारी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी आज घरीच राहणे पसंत केले. मोशी गावठाणातील रस्ते, पुणे-नाशिक महामार्ग, देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग, मोशी-चिखली प्राधिकरणातील स्पाइन रस्त्यासह सर्व उपरस्ते, श्री नागेश्‍वर महाराज चौक, भारत माता चौक, जुना जकात नाका चौक, जय गणेश साम्राज्य चौक, स्पाइन सिटी चौक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौक निर्मनुष्य होते.

चिखली परिसर
छत्रपती शिवाजी महाराज चौक, साने चौक, कृष्णानगर येथील भाजी मंडई चौक आणि चिखली रोड या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी संपूर्ण शुकशुकाट होता; तर कुदळवाडी भागात कंपन्या, तसेच भंगार व्यवसाय बंद असल्याने रस्ते निर्जन होते. चिखली प्राधिकरण, जाधववाडी, संभाजीनगर, शाहूनगर या परिसरही सुनासुना होता. दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. कंपन्यांना सुटी असल्याने अनेक जण नातेवाइकांकडे जेवण्यासाठी जात होते. त्या वेळी पोलिसांनी फिरण्यास बंदी असल्याचे सांगून मारहाण केल्याचे तरुण किशोर भंडारी यांनी सांगितले.

कुटुंबाला मिळाला आधार
नाशिकला जाण्यासाठी भोपाळमधील एक कुटुंब भोसरीत एसटी बसअभावी अडकले होते. त्यांची काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. याशिवाय बीआरटीएस टर्मिनलचे वाहतूक नियंत्रक काळूराम लांडगे, सुरेश कवडे, विजय आसादे, भाऊसाहेब हिंगडे आदींनी पोलिसांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.

कोरोना व्हायरस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com