esakal | जयंत पाटलांनी सांगितलं अजित पवारांच्या स्वभावाच गुपित
sakal

बोलून बातमी शोधा

जयंत पाटलांनी सांगितलं अजित पवारांच्या स्वभावाच गुपित

''अजितदादा पवार यांची काम करण्याची पद्धत आम्ही सर्वांनी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. ते खऱ्या अर्थाने तळागळातून आलेले नेते यासाठी आहेत की, त्यांनी शेतीतील भाजीपाला विकणे इथपासून ते संस्था सांभाळणे, आमदार, मंत्री अशा साऱ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे.''

- जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री

जयंत पाटलांनी सांगितलं अजित पवारांच्या स्वभावाच गुपित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अजितदादा आणि माझा गेली तीसहून अधिक वर्षांचा स्नेह आहे. मी, दिलीपराव वळसे-पाटील, आर. आर. आबा, अजितदादा असे आम्ही सर्व एकाच वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून आलो आणि त्यामुळेच आम्हाला प्रदीर्घकाळ सोबत काम करता आले. अजितदादांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदातून झाली. १६ वर्षे अजितदादा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी ३०० कोटींहून १ लाख ६० हजार कोटींपर्यंत पोचल्या. अत्यंत सक्षमपणे
त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक सांभाळलेल्या नेत्यांना शरद पवार यांनी लोकसभेवर जाण्याची संधी दिली आणि ते प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले. बहुधा अजितदादांच्या खमक्या स्वभावाला लोकसभा रुचली नसावी की काय महाराष्ट्राच्या विधिमंडळात परतले.

सुधाकरराव नाईक यांनी अजितदादांच्या कामांचा झपाटा बघून त्यांची कृषी आणि उर्जाखात्याचे राज्यमंत्री म्हणून निवड केली. त्यानंतर शरद पवार यांच्या मंत्रिमंडळातही अजितदादांनी उत्तम कामगिरी बजावली. १९९५ ते१९९९ या काळात आम्ही सर्वजण विरोधी पक्षात होतो. त्यावेळी मी, दादा, आबा, दिलीपराव असे एकत्र विधानसभेत बसायचो. पत्रकारांनी त्यावेळी आम्ही सभागृहात बसायचो त्या जागेला ‘अशांत टापू’ असे नाव दिले होते. १९९५ ते १९९९ याकाळात आम्ही विरोधी पक्षात असताना आम्ही सरकारच्या चुकीच्या धोरणांवर अक्षरश: तुटून पडत असू. १९९९ मध्ये आम्ही एकाच वेळी कॅबिनेट मंत्री झालो. माझ्याकडे पक्षाने अर्थखात्याची जबाबदारी दिली. अजितदादा यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी होती. पुढे १५ वर्षे सत्तेत असताना जी-जी खाती अजितदादांना मिळाली त्यात त्यांनी अत्यंत समरस होऊन काम केले. मंत्रिमंडळ बैठकीत दादा अत्यंत हिरिरीने जनतेच्या भूमिका मांडत. पुढे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतही त्यांनी झोकून देऊन काम केले.

हेही वाचा: पुणे : घाटमाथ्यावर अति मुसळधार तर शहरात मध्यम पावसाची शक्यता

अजितदादांची प्रशासानांवरील पकड, पुणे-पिंपरी चिंचवड शहर व बारामती तालुक्याच्या विकासात त्यांचे असलेले योगदान हे अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. सार्वजनिक जीवनात इतकी वर्षे वावरल्यानंतरही अजितदादा व्यसनांपासून अत्यंत लांब आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही ते व्यसनांपासून दूर राहण्याची ताकद देत असतात.

सकाळी सात वाजल्यापासून कामाला लागणे आणि कामांत शिस्त पाळणे ही अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. अनेकदा वरवर जरी ते कडक स्वभावाचे वाटत असले तरी आतून ते मृदू आणि हळव्या स्वभावाचे आहेत. अजितदादांनी साठी पार केली, यावर विश्वासच बसत नाही, इतके ते तरुण आणि उत्साही वाटतात.

अजितदादा पवार यांच्यासारख्या लोकनेत्याचे कर्तृत्व प्रकाशझोतात आणण्यासाठी सकाळ समूह अजितदादांवर ग्रंथ प्रकाशित करीत आहे, ही आनंददायी बाब आहे. जीवनातील कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची अजितदादांमध्ये क्षमता आहे. ही क्षमता अशीच कायम राहावी याच अजितदादांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..! अशाच सुदृढ जीवनाची शंभरी अजितदादांनी गाठावी हीच इच्छा.

loading image