esakal | पुणे : घाटमाथ्यावर अति मुसळधार तर शहरात मध्यम पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rainfall

पुणे : घाटमाथ्यावर अति मुसळधार तर शहरात मध्यम पावसाची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गुरुवारी (ता. २२) अतिमुसळधार व पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात विविध ठिकाण जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे शहरात दिवसभर आकाश ढगाळ राहून बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा जास्त राहील. त्यामुळे तुरळक ठिकाण जोरदार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळले ७४५ कोरोना रुग्ण

अरबी समुद्रात असलेल्या आणि बंगालच्या खाडीत होऊ घातलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील ४८ तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेष करून कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरपण येणाऱ्या वाऱ्याचा वेग जास्त असून, त्यांनी सोबत आणलेल्या ढगांमुळे राज्यात शुक्रवार (ता. २३) बहुतेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यातही जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेडला गुरुवारी (ता.२२) जोरदार पावसाची शक्यता आहे. रविवारनंतर (ता.२५) मात्र हा पाऊस कमी होत जाईल. विदर्भातही पुढील ४८ तासात जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे विभागात आतापर्यंत १७ लाख कोरोनामुक्त

बाहेर फिरताना काळजी घ्या

पुढील ४८ तासात कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अशा ठिकाणी फिरायला जाताना शक्यतो टाळावेच, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुणे-मुंबई दृतगतीमार्गावर धुके सदृश स्थिती जास्त काळ राहील. तसेच जिथे सातत्याने पाऊस पडतो तेथे दरडी कोसळण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

शहरातील पाऊस (मिलिमीटर)

पुणे ः ३.८

पाषाण ः ४.२

लोहगाव ः १

loading image