शिवसेनेच्या शैला खंडागळे देहू लोहगाव गटात विजयी 

PNE19P30567.jpg
PNE19P30567.jpg

देहू : जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराला झाला. या निवडणुकीत 120 मतदारांनी नोटाचा वापर केला. विजयानंतर खंडागळे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल, भंडाऱ्याची उधळण करीत गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. 

शैला खंडागळे यांना 4117 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र चव्हाण यांना 2957 तर काँग्रेसचे रूपेश चव्हाण यांना 1040 मते मिळाली. सोमवारी पुणे येथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. निवडणूक कार्यकारी अधिकारी सुनील कोळी यांनी शैला खंडागळे यांना विजयी घोषित केले. 

देहू लोहगाव गट हा मावळ लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष होते. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार बाळा भेगडे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुक्‍यातील व जिल्ह्यातील नेतेही देहूत तळ ठोकून होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनीही देहूचा दोन वेळा दौरा केला. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची ठरली. 

या विजयाबाबत शिवसेनेचे देहू शहरप्रमुख सुनील हगवणे म्हणाले, ""भाजप आणि शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजय खेचून आणला आहे. "धनशक्ती विरुद्ध जनशक्ती', असे या निवडणुकीचे स्वरूप होते.'' 

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे म्हणाले, "युतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे, हेच आमचे धोरण होते. त्यानुसार आम्ही विजय मिळविला.'' 

"राष्ट्रवादी काँग्रेसने या गटात मंगल जंगम यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी माझा केवळ 14 मतांनी पराभव झाला होता. निवडणूक आयोगाने जंगम यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यासाठी मी दोन वर्षे पाठपुरावा केला. देहूतील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.'' 
- शैला खंडागळे, शिवसेना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com