भंडाऱ्याच्या उधळणीने जेजुरी गड सोनेरी

भंडाऱ्याच्या उधळणीने जेजुरी गड सोनेरी

जेजुरी : जेजुरीत खंडोबाच्या सोमवती यात्रेत भाविकांचा पूर लोटला. सुमारे चार लाख भाविकांनी जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. जेजुरीत रात्रीपासून गर्दी उसळली होती. महाद्वार रस्ताही गर्दीने फुलून गेला होता.

गडावर आज दुपारी एक वाजता पालखी सोहळा सुरू होणार होता. वाद्य वाजायला लागताच भाविकांनी मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण सुरू केली. त्यामुळे गड व गडावरील भाविक सोनेरी झाले होते. पेशव्यांनी इशारा देताच एक वाजता पालखीचे गडावरून प्रस्थान झाले. या वेळी मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, खांदेकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त शिवराज झगडे, विश्वस्त राजकुमार लोढा, संदीप जगताप, पंकज निकुडे, तुषार सहाणे, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, ऍड. अशोकराव संकपाळ आदी उपस्थित होते. 

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखी जेजुरीत आली. जानुबाई मंदिरात स्थानिक नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जागोजागी चहा व नाष्ट्याची सोय देवसंस्थान व स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. शहरात सर्व रस्त्यावर भंडाऱ्याची दुकाने लावली होती. दोनशे रुपये किलो दराने भंडार-खोबऱ्याची विक्री होताना दिसत होती. पालखी मार्गावर रांगोळी काढून भाविक पालखीचे स्वागत करीत होते. 

गर्दीचा उच्चांक 
विवारी रात्रभर भाविक दर्शनासाठी जेजुरीत येत होते. श्री क्षेत्र कडेपठारावरही भर उन्हात गर्दी करून होते. शहरात वाहनांना प्रवेश बंदी केल्याने भाविकांना चालण्यासाठी रस्ते मोकळे मिळाले. गेल्या काही वर्षातील गर्दीचा यंदा उच्चांक ठरला आहे. सुमारे दोनशे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. यंदा पालखी सोहळ्याला कमालीचा उत्साह जाणवत होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविक पालखीवर भंडाऱ्याची उधळण करीत होते. 

भंडाऱ्याची पोत्याने उधळण 
तुडुंब गर्दीमुळे पालखीची मंदिर प्रदक्षिणा घेताना वेळ लागला. भाविक सज्यावरून भंडाऱ्याची पोत्याने उधळण करीत होते. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, असा जयघोष करीत भाविक भंडाऱ्याची उधळण करीत होते. हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण गड गर्दीने माखला होता. सायंकाळी पाच वाजता पालखी कऱ्हा नदीवर आली. तेथे उत्सवमूर्तींना दही दुधाणे व कऱ्हेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. कऱ्हेच्या पात्रात गाळमिश्रित पाणी असल्याने 
भाविकांनी टॅंकरच्या पाण्याने स्नानाची पर्वणी साधली. या वेळी कऱ्हा नदीवर सुमारे चाळीस हजार भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com