खंडोबाच्या दर्शनाला मॉरिशसमधून जेजुरीला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

मॉरिशसमध्ये फ्रेंच आणि आफ्रिका मिळून क्रिओल भाषा बोलली जात असली तरी मराठी बांधव शुद्ध मराठीतून बोलतात. तेथील शाळेत 50 मिनिटांचा मराठीचा तास घेतला जात असून, त्यामध्ये महापुरुषांचा इतिहास, मराठी देवदेवता, सण, उत्सवांचे महत्त्व शिकविले जातात.
-हिराबाई लखना, मराठी शिक्षिका, मॉरिशस

साताराऱ्यातील भोसले व गायकवाड कुटुंबाच्या पाचव्या पिढीकडून परंपरेची जपणूक

जेजुरी: दीडशे वर्षांपूर्वी खलाशी म्हणून काम करताना मॉरिशसमध्ये स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबातील पाचव्या पिढीतील तीस सदस्य जेजुरीत खंडोबाचा कुलधर्म-कुलाचार करण्यासाठी आले होते.

सातारा जिल्ह्यातील पाली (पेंबर) नजीकच्या गावातील लक्ष्मण भोसले, गायकवाड व त्यांचे सहकारी 1864 मध्ये बोटीवर खलाशी म्हणून काम करताना ते मॉरिशस येथे स्थायिक झाले. त्या वेळी त्यांच्याकडे कुलदैवत खंडोबासह तुळजाभवानी, अंबाबाईचे टाक बरोबर होते. परदेशात राहूनही या परिवाराने आपली धार्मिक मराठी परंपरा सोडली नाही. मॉरिशसमध्येही या कुलदैवतांचे सर्व सण, उत्सव मोठ्या श्रद्धेने तेथे साजरे करीत असतात. हीच परंपरा सध्याच्या पाचव्या पिढीने म्हणजेच अनिल भोसले, त्यांची पत्नी मीनाक्षी भोसले, वृशांत म्हाडकर-गायकवाड, मल्हारी आबाजी परब, जयश्री रामा आबाजी परब, प्रशिक शिकानंद हिरू पवार, मनीषा हिरू राघू पवार, राजेंद्र कुमार पंडू पंढरकर, हिराबाई लखना आदींनी जोपासली आहे. सध्या या परिवारातील सुमारे 30 सदस्य भारतात आलेले असून, तुळजापूर, कोल्हापूर, नेवासा व खंडोबाच्या 11 स्थळांना भेटी देत आहेत. सध्या या परिवाराचा निवास जेजुरीतील राष्ट्रवादीचे नेते दिलीप बारभाई यांच्याकडे आहे. इटली व इंग्लंडमध्येही काही सदस्य स्थायिक आहेत. त्या ठिकाणी फक्त गोंधळ साजरा केला जातो. भोसले यांच्या मॉरिशस येथील जगदंबे निवास या ठिकाणी खंडोबा व तुळजाभवानी मंदिर आहे.

 

मॉरिशसमध्येही होतात मराठी उत्सव
अनिल भोसले व वृशांत म्हाडकर यांनी सांगितले, की आमच्या पूर्वजांनी धार्मिक विधी, सण उत्सवांची परंपरा जोपासली होती. तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. मॉरिशसची लोकसंख्या 12 लाख असून सुमारे 30 हजार मराठी परिवार तेथे स्थायिक झालेले आहेत. आमच्या कुटुंबामध्ये आषाढी-कार्तिकी एकादशी, गणपती उत्सव, महाशिवरात्री आदी उत्सवांसह खंडोबाचे सोमवती अमावस्या, पौष, माघ, चैत्रपौर्णिमा, चंपाषष्ठी उत्सव साजरे केले जातात. तेथे खंडोबाचे सर्व कुलधर्म-कुलाचार केले जातात. जागरण गोंधळ करताना देवाला लागणारी हळद (भंडारा) जात्यावर दळली जाते. चंपाषष्ठी उत्सव सहा दिवस असतो. कुलधर्म-कुलाचाराचे विधीही तेथे होतात.

देवसंस्थानकडून स्वागत
श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाने मॉरिशसवासीय मराठी परिवाराची भेट घेत त्यांचे स्वागत केले. तसेच शनिवारी (ता. 7) त्यांच्या हस्ते खंडोबाची पहाटेची भूपाळी व आरती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: jejuri khandoba darshan from mauritius marathi family