वाघोलीत गोळीबार करून ज्वेलर्सचे दुकान लुटले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

पुणे - वाघोली येथील बगाडे ज्वेलर्सच्या दुकानावर मंगळवारी दुपारी दोन चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरने गोळीबार करून सोन्याचे दागिने लुटून नेले. या गोळीबारात दुकानातील एक कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेत पाच लाख 69 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरट्यांची प्रतिमा सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

वाघोली येथे बायफ रस्त्यावर बगाडे ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे या दुकानात आले. त्या पैकी एक जण बाहेर थांबला; तर अन्य एक जण ग्राहक असल्याच्या बहाण्याने दुकानात दागिने पाहत होता. दुकानातील कर्मचारी संजय नागनाथ बेंद्रे आणि सेल्समन सिद्धेश निवृत्ती भुजबळ हे दोघे कामात व्यस्त होते. त्या वेळी दुसऱ्या चोरट्याने कर्मचाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर रोखत "हमें खून-खराबा पसंद नहीं, सब चुपचाप बैठो', अशी धमकी दिली. त्यामुळे सर्व कर्मचारी घाबरले. मात्र, एका महिला कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत सायरन वाजविला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी दागिन्यांच्या शोकेसमधून काही दागिने घेऊन पळ काढला. सेल्समन भुजबळ आणि व्यवस्थापक शिवाजी असवले यांनी चोरट्यांचा पाठलाग केला; परंतु चोरट्यांनी दुकानाबाहेर येऊन गोळीबार करीत ते पसार झाले. त्यात सेल्समन भुजबळ (वय 24, रा. तळेगाव ढमढेरे) यांच्या खांद्याला गोळी लागली. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: jewelers shop by firing at Wagholi