

झारखंडमध्ये
आंदोलनाचा भडका
विद्यार्थ्यांची विधानसभेवर धडक; पोलिसांच्या लाठीमाराचे तीव्र पडसाद
रांची, ता. १० (पीटीआय) : भरती परीक्षेतील गैरप्रकारांवरून आंदोलन करणाऱ्या झारखंडमधील विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट विधानसभेच्या आवारापर्यंत धडक मारली. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर असंवेदनशील आहे, असा आरोप करत या आंदोलकांनी विधानसभेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, त्याचबरोबर पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला. काही आंदोलक रात्री उशिरापर्यंत विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळच होते. सरकारकडून आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही आले नव्हते, असे सांगत विद्यार्थी नेत्यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन आयोगाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून विद्यार्थी संघटना १७ दिवसांपासून आंदोलन करत आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये रविवारी झालेली चर्चा निष्फळ झाली. सरकारने तीन परीक्षा रद्द करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, २०१९ पासूनच्या १३ परीक्षा रद्द करा आणि या गैरप्रकारांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, या मागण्यांवर विद्यार्थी संघटना ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी संघटनांनी सोमवारी विधानसभेला घेराव घालणार असल्याचे जाहीर केले होते. सरकारनेही तयारी म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. विधानसभेच्या चार किलोमीटरपेक्षा जास्त संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, शीघ्र कृती दल, केंद्रीय सुरक्षा दले, जिल्हा पोलिस, शीघ्र प्रतिसाद पथकांचे १५००पेक्षा जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
धुर्वा येथील विधानसभेच्या जुन्या इमारतीपासून सकाळी १०.३० वाजता आंदोलकांनी मोर्चाला सुरुवात केली. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून, तिथपर्यंत जाण्याचा या संघटनांचा निर्धार होता. हा मोर्चा जगन्नाथपूर मंदिराजवळील अखेरच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखले. मात्र, आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलक अन्य मार्गानेही विधानसभेच्या आंदोलनात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करण्यात आला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. पोलिसांच्या लाठीमारामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. यामध्ये विद्यार्थिनींचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे, असे काही जखमींनी सांगितले.
‘विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीमार नृशंस होता. आम्ही शांततेने आंदोलन करत होतो आणि सरकारने आमच्यावर लाठ्या उगारल्या. यातून केवळ आमच्या अंगावर जखमा होऊ शकतात, मात्र ते आमच्या विचारांना रोखू शकत नाहीत. पोलिसांच्या लाठीमारामध्ये अनेक विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी आमची डोकी, चेहरे, हात-पाय लक्ष्य करून मारहाण केली,’ असे पीयूषकुमार सोनी या आंदोलकाने सांगितले. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजपने लाठीमाराचा निषेध केला आहे.
झारखंड सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला, हे निषेधार्ह आहे. सरकार घाबरलेले आहे. जेव्हा जेव्हा सरकार घाबरते, तेव्हा ती पोलिसांना पुढे करते.
- देवेंद्रनाथ महतो, विद्यार्थी नेता
झारखंड लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना अटक
भरती परीक्षेतील गैरप्रकारांवरून झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एल. खियांग्ते यांना सीआयडीने सोमवारी अटक केली. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या २० झाली आहे. खियांग्ते यांची फेब्रुवारीमध्ये झारखंड लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी झारखंडचे मुख्य सचिव होते. खियांग्ते यांची २८ जुलैपासून चार वेळा चौकशी करण्यात आली आहे. तसेच, सीआयडीने रविवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानासह अनेक ठिकाणांची झडती घेतली आहे. आयोगाच्या तीन सदस्यांनी रविवारी राजीनामे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.
महतो मोर्चात सहभागी
झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष देवेंद्रनाथ महतो नऊ दिवसांपासून उपोषण करत असून, त्यांचे वजन १०.५ किलोंनी कमी झाले आहे. तेही रुग्णवाहिकेतून या मोर्चामध्ये सहभागी झाला. माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची प्रतिमा त्याच्याजवळ होती.
आज पुन्हा विधानसभेला घेराव
- आंदोलन रोखण्यासाठी विधानसभा परिसरात कडेकोट बंदोबस्त
- अधिवेशन सुरू असतानाच, विद्यार्थ्यांचा विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न
- आंदोलनामुळे दुपारनंतर विधानसभेचे कामकाज स्थगित
- पोलिसांकडून पाण्याचे फवारे मारल्यानंतर आंदोलकांनी नाच करत लक्ष वेधले
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मंगळवारी विधानसभेला घेराव घालणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.