पुणे जिल्ह्यात ३१ हजार जणांना रोजगार; या क्षेत्रामध्ये तरुण-तरुणींना संधी

अनिल सावळे
Friday, 27 November 2020

लॉकडाउनमध्ये अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. परंतु, या कालावधीत आणि ‘मिशन बिगिन अगेन’नंतर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात खासगी औद्योगिक, सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधीबाबत आशादायक चित्र दिसू लागले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रयत्नातून दीड हजार तसेच केंद्राच्या माध्यमाशिवाय साधारण वर्षभरात स्वत:हून प्रयत्न करणाऱ्या ३० हजारांहून अधिक तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध झाला आहे.

पुणे - लॉकडाउनमध्ये अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. परंतु, या कालावधीत आणि ‘मिशन बिगिन अगेन’नंतर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात खासगी औद्योगिक, सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधीबाबत आशादायक चित्र दिसू लागले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रयत्नातून दीड हजार तसेच केंद्राच्या माध्यमाशिवाय साधारण वर्षभरात स्वत:हून प्रयत्न करणाऱ्या ३० हजारांहून अधिक तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात तर, पदवीधारकांना विमा, सेल्स मार्केटिंग आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार केंद्राने गेल्या आठ महिन्यांत सात ऑनलाइन रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्यामध्ये औद्योगिक कंपन्यांसह इतर उद्योग आणि सेवा क्षेत्रातील ६६ उद्योजकांनी सहभाग नोंदवला. या उद्योगांकडील ११ हजार ८८० रिक्‍त पदे भरण्यासाठी २३ हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी मुलाखती दिल्या. त्यापैकी दीड हजारांहून अधिक जणांना नोकरी मिळाली. याशिवाय परस्पर नोकरीस लागलेल्या तरुण-तरुणींची संख्या ३० हजारांपेक्षा अधिक आहे.  

...तर बांधकाम व्यावसायिक देशाधडीला लागतील; ग्राहकांनाही बसेल आर्थिक फटका

रोजगार प्रोत्साहन योजना
रोजगाराचे कौशल्य नसलेल्या तरुणांना कंपनीकडून सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. या कालावधीत त्यांना कंपनीकडून वेतन दिले जाते. तर, जिल्हा रोजगार केंद्राच्या वतीने कंपन्यांना प्रत्येकी तीनशे ते एक हजार रुपयांपर्यंत विद्यावेतनाची प्रतिपूर्ती रक्‍कम दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या गरजेनुसार त्या व्यक्‍तीस कामावर घेतले जाते.

लॉकडाउनमध्ये वाहतूक व्यवस्था ठप्प होती. तसेच, बाहेरून आलेल्यांना क्वारंटाइन व्हावे लागत होते. त्यामुळे १२ हजार जागा रिक्‍त असूनही त्या प्रमाणात कौशल्यप्राप्त उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. परंतु, सद्यःस्थितीत सकारात्मक बदल होत आहेत. औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांशी समन्वय साधून ऑनलाइन रोजगार मेळावे आणि वेबिनारच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- अनुपमा पवार, सहायक आयुक्‍त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

धक्कादायक! पी.पी.ई किट न परिधान करता केली जाते पुण्यातील या ठिकाणी तपासणी

कंपन्यांना नोंदणी बंधनकारक
२५ किंवा त्यापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या कंपन्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार केंद्राच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कंपन्यांना विनामूल्य मनुष्यबळ तर गरजू तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. बेरोजगार तरुणांनी जिल्हा रोजगार केंद्राच्या पोर्टलवर शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत करावा, असे आवाहन रोजगार केंद्राने केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job opportunities for 31000 people in Pune district