लिफ्ट बंद असल्याने कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात करावी लागतेय पायपीट

Divyang
Divyang

पौड रस्ता - दिव्यांग, ज्येष्ठांना कोथरूड आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयात कामासाठी जाणे म्हणजे एखादा गड चढण्यासारखेच आहे, अशी भावना अमोल शिणगारे यांनी व्यक्त केली. शिणगारे म्हणाले की, नागर वस्ती विकास योजना वा महापालिकेशी संबंधित काही कामांसाठी या क्षेत्रीय कार्यालयात जाण्याचा योग आला, तर आमचे फार हाल होतात. अपंग, ज्येष्ठ वा कोणाही नागरिकाला कार्यालयात जायचे असेल, तर तेथे योग्य व्यवस्था असणे आवश्‍यक आहे.

ॲड. शिवाजी भोईटे म्हणाले, की कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती असा फलक येथे लावलेला नाही. तिसऱ्या मजल्यावर सभागृहात आधार कार्ड नोंदणीची मशिन आहे. येथे काही बैठक चालू असल्यास आधार कार्ड काढता येत नाही. अपंग व ज्येष्ठांना पायऱ्या चढून येणे अवघड जाते. याचा विचार करून येथे योग्य ती सोय करावी.

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर विवाह नोंदणी व आधार कार्ड नोंदणी व्यवस्था आहे. 
या संदर्भात विचारले असता, आधार कार्ड व जनगणना समन्वयक अंबरीश लोहकरे म्हणाले, ‘‘आपल्याकडे आधार कार्डच्या दोन मशिन आहेत. खालच्या मजल्यावरील एक मशिन सुरू आहे. वरच्या मजल्यावरील मशिनसाठीसुद्धा आम्ही खाली जागा करत आहोत. एखादी अपंग व्यक्ती आधार कार्ड काढू इच्छित असेल, तर त्याला खुर्चीची व्यवस्था करता येते. घरी येऊन आधार कार्ड काढायचे असेल, तर जिल्हाधिकारी कार्यालयात तसा अर्ज द्यावा लागतो. सोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडावे लागते. नंतर घरी येऊन आधार कार्ड काढले जाते. येथील मशिन स्थायी स्वरूपाच्या आहेत. आधार कार्ड दुरुस्तीसाठी आम्ही पन्नास रुपये सेवा शुल्क आकारतो. नवीन आधार कार्ड मोफत मिळते.’’

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात लिफ्ट बसविण्याचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. लवकरच येथे लिफ्ट बसविण्यात येईल. 
- गणेश सोनुने, सहायक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com