पुणे-मुंबई प्रवास होणार कोंडीमुक्त

पुणे-मुंबई प्रवास होणार कोंडीमुक्त

पुणे - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन तिचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

पावसाळ्यात अनेकदा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (एक्‍स्प्रेस वे) दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. दरडी काढण्याच्या कामादरम्यान किंवा एखादा मोठा अपघात झाल्यानंतर ‘एक्‍स्पेस वे’वर वाहतूक कोंडी होते; तसेच सलग येणाऱ्या सुट्यांमुळे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागतात. अशावेळेस ‘एक्‍स्प्रेस वे’वरील वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवली जाते. या महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाल्याने या रस्त्यावरही वाहनांची संख्या वाढली आहे. या महामार्गावरील महत्त्वाच्या चौकांत ‘यू टर्न’ घेण्यासाठी; तसेच पलीकडे वळण घेण्यासाठी एखादी गाडी थांबली तरी पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. 

या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ने घेतला आहे. केंद्र सरकारच्या भूपुष्ठ मंत्रालयाकडून या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढून या कामाला सुरवात होईल, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. देहूरोड ते लोणावळ्यापर्यंत नऊ ठिकाणी होणाऱ्या उड्डाण पुलांसाठी अंदाजे खर्च ३६० कोटी रुपये येणार आहे. त्यामुळे या प्रमुख नऊ चौकांत होणारी वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल. रस्त्याच्या पलीकडे जावयाचे अथवा वळण घ्यावयाचे आहे, अशा प्रवाशांना उड्डाण पुलाखालून जाता येणार आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर प्रामुख्याने लोणावळा, तळेगाव, कामशेत या ठिकाणी जाण्यासाठी करण्यात येतो. या महामार्गावरून पुढे द्रुतगती महामार्गावरसुद्धा जाता येते. नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावार तळेगाव येथे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. तळेगाव, वडगाव मावळ, चाकण येथे औद्योगिकरण वाढल्याने अवजड वाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व बाबींचा विचार करून ‘एमएसआरडीसी’ने जुन्या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com